सिंधुदुर्गात नवे ६१० करोनाबाधित, १०२ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ३१ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ६१० करोनाबाधित आढळले, तर अवघे १०२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. दरम्यान, करोनाच्या रुग्णांनी जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १४ जणांसह जिल्ह्यात आज एकूण ६१० व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २६ हजार ५३२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज बरे होऊन गेलेल्या १०२ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ९३१ जण करोनामुक्त झाले आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७१, दोडामार्ग – १४, कणकवली – ७०, कुडाळ – ९६, मालवण – ११७, सावंतवाडी – १२३, वैभववाडी – २९, वेंगुर्ले – ७४, जिल्ह्याबाहेरील २.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७३०, दोडामार्ग ३०९, कणकवली ९०७, कुडाळ १३२५, मालवण १०६१, सावंतवाडी ९२५, वैभववाडी २०३, वेंगुर्ले ४३०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी ३१९ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६८४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, कुडाळ ३, मालवण ३, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ९१, दोडामार्ग – २०, कणकवली – १४४, कुडाळ – ९९, मालवण – १०८, सावंतवाडी – ११४, वैभववाडी – ४७, वेंगुर्ले – ५९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

जनआरोग्य योजनेचा लाभ

करोनाच्या रुग्णांमध्ये ज्यांची ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी झालेली आहे किंवा रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत, अशा रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व शासकीय कोविड रुग्णालयात आणि एसएसपीएम हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेज (पडवे), संजीवनी हॉस्पिटल (कणकवली) आणि साईलीला हॉस्पिटल (नाटळ, ता. कणकवली) या तीन खासगी रुग्णालयात लाभ घेता येतो. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply