ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपने कोविड रुग्णालयासाठी दिले चार लाख

देवरूख : येथील मातृमंदिरशी निगडित ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह परिवार व्हॉट्स अॅप ग्रुपने मातृमंदिरच्या कोविड सेंटरला ४ लाखाची देणगी दिली. अशोक वायकूळ यांच्या पुढाकाराने ही देणगी संकलित झाली.

सोशल मीडियाचा वापर करत गेली साडेचार वर्षे समाजसेवेत कार्यरत असलेल्या स्नेह परिवाराने मदतीचा हा हात पुढे केला आहे. ग्रुपचे ८० टक्क्यांहून अधिक सभासद ज्येष्ठ नागरिक आहेत. या स्नेह परीवाराच्या सदस्यांनी सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्याजवळील पुंजी एकत्र करून चार लाखाची देणगी गोळा केली. ती देवरूख मातृमंदिर डेडिकेटेड कोविड सेंटरकडे सुपूर्द केली.

देवरूख येथे मावशी हळबे यांच्या विचारांनी चाललेले मातृमंदिर हॉस्पिटल आहे. मातृमंदिर संचालित एसएमएस हॉस्पिटलने कोविडबाधितांची सेवा करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले. देवरूखसारख्या ग्रामीण भागात हे सेंटर सुरू करणे जोखमीचे होते. तरीही दानशूरांच्या, संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हे शिवधनुष्य पेलले गेले. ३० बेडचे सर्वसोयींनी युक्त सेंटर सुरू झाले. या सेंटरसाठी आपणही काहीतरी करावे, असे मातृमंदिरचे माजी संचालक आणि मावशींची प्रेरणा घेऊन समाजसेवेतच आयुष्य घालवलेले ७७ वर्षीय अशोक वायकूळ यांनी देणगी गोळा करण्याचा निर्धार केला.

ही बाब त्यांनी आपण अॅडमिन असलेल्या सोशल मीडियाच्या स्नेह परिवाराशी बोलून दाखवली. स्नेह परिवाराचे दोन ग्रुप आहेत. त्यामध्ये पाचशे सभासद आहेत. सेवानिवृत्त झालेले वकील, प्राध्यापक, डॉक्टर त्यामध्ये आहेत. या सर्वांनी हे समाजसेवेचे कार्य आहे, असे समजून यथाशक्ती पैसे जमवले. वायकूळ परिवाराने ४० हजार जमवले. उद्योगपती रामकृष्ण कोळवणकर यांनी १ लाख रुपये दिले. असे करता करता डॉ. वायकूळ यांनी एकूण ४ लाखाचा निधी जमवून मातृमंदिर कोविड सेंटरच्या बँक खात्यात जमा केले. पाच लाखाचे उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहोत, असे श्री. वायकूळ यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियावरुन अशीही सामाजिक बांधिलकी जपता येते आणि स्नेह वाढवता येतो, हेच दाखवून दिले आहे.

मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सचिव आत्माराम मेस्त्री, डॉ. परमेश्वर गौंड, समन्वयक सतीश शिर्के यांनी डॉ. अशोक वायकूळ आणि स्नेह परिवाराचे आभार मानले आहेत. भविष्यात मातृमंदिर हॉस्पिटल ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नवजीवन देणारे हक्काचे ठिकाण बनणार आहे.

…………………

कार्याध्यक्षांना पत्र

स्नेह परिवाराच्या देणगीबद्दल मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी श्री. वायकूळ यांचे आभार मानले. त्याला श्री. वायकूळ यांनी पाठविलेले उत्तर.

प्रणाम.
तुझे विचार, मनोगतातून समजले.
तू मातृमंदिर देवरूख संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून “स्नेह परिवार” सदस्यांचे केलेले कौतुक भावले.
आभार.

स्नेह परिवारचे सदस्य होण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण आपल्या ग्रुपवर होत नाही. तू सदस्य असल्याने तुला हे ठाऊक आहे.
चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्नेह ग्रुपची वाटचाल स्नेह परिवार म्हणून विकसित होत गेली.
मातृमंदिर देवरूखसाठीचे आर्थिक आवाहन हा प्रथम प्रयोग होता. तो सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे यशस्वी होत आहे.

अजूनही देणगी जमविणे सुरू आहे. उद्योगपती रामकृष्ण हरिशेठ कोळवणकर यांच्या एक लाखांच्या भरघोस देणगीमुळे आपल्या संकल्पास अधिक बळ प्राप्त झाले.
कोविडनंतर मातृमंदिर देवरूखची पुढील वाटचाल तुझ्या मनोगतातून व्यक्त केली आहेस, त्यामुळे देणग्यांचा ओघ थांबविणार नाही, याची खात्री बाळगावी.

आनंदवन, हेमलकसाला नियमित सहली आयोजित करण्यात स्नेह परिवार पुढे होता. आता अशा सहली मातृमंदिर देवरूखला आणता येतील.
माझ्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अशा सहलीचे नियमित नियोजन करीत असे.

सदस्यांना नम्र विनंती, अजूनही तुम्ही देणगी देऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.
देणगीदारांचे मनःपूर्वक आभार. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या गुणवंत सदस्यांच्या परिवाराचा मी प्रमुख असल्याचा मला अभिमान आहे.

  • अशोक वायकूळ
    (संपर्क : 98693 37303)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply