बाटलीवाली!

परप्रांतातून संगमेश्वरला आलेली साधारण पस्तिशीच्या वयाची एक स्त्री, अंगात कळकट फुलशर्ट आणि बर्म्युडा. डोक्यात केसांच्या जटा झालेल्या, महामार्गाच्या दुतर्फा टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करते. जागोजागी त्याचे ढीग करून ठेवते. रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर साठल्या की त्यांची विक्री करून त्या पैशातून महामार्गाच्या कडेलाच स्वतःचा उदरनिर्वाह करते. कधी कधी मस्तक फिरले तर मोठ्यामोठ्याने ओरडत येरझारा घालते. तिचे काम पाहिले तर तिला मनोरुग्ण म्हणता येणार नाही. मात्र तिचा अवतार पाहून ओरडणे ऐकले की ती मनोरुग्ण असल्याची खात्री पटते. मनाच्या संवेदना मूक झाल्याने ‘ए ….. बाटलीबाय……… !’ अशी हाळी न देता महामार्गालगत फेकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करणारी ही बाटलीवाली आपल्या कृतीतून शहाण्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत होती.

मुंबई-गोवा महामार्ग संगमेश्वरमधून गेला असल्याने तसेच रेल्वे स्टेशनही जवळ असल्याने मनोरुग्ण येथे येण्याचे प्रमाण तसे बऱ्यापैकी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास संगमेश्वरजवळच्या माभळे गावात अशीच एक बाटलीवाली बाई आली. हिंदी भाषिक असल्याने ती महाराष्ट्राबाहेरची असल्याचे स्पष्ट झाले होते. शासकीय विश्रामगृह ते माभळ्यातील सोनवी पूल या परिसरात तिचा वावर होता. मनोरुग्ण असूनही स्वावलंबी असणारी ही महिला नक्कीच एक वेगळा संदेश देत होती. स्वतःच्या सुरक्षेसाठी बहुधा ती शर्ट आणि बर्म्युडा वापरत असावी, असे दिसून आले. सोनवी पुलाजवळ एका झाडाखाली महामार्गालगत तिने आपला संसार थाटला होता. एका काळ्या रंगाच्या बॅगेत तिचे तिचे कपडे होते. ते असूनही तिने अंगावरचे कपडे कधीही बदलले नाहीत. संगमेश्वरपासून बावनदीपर्यंत चालत जायचे आणि प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमवायच्या हे काम ती दररोज न चुकता करत होती. जमवलेल्या बाटल्या गोणपाटात भरून ती जागोजागी ठेवून देई आणि रिक्षाटेंपोची भर झाली की रिक्षाटेंपो भाड्याने करून स्वतः बाटल्यांचे गोणते टेम्पोत भरून संगमेश्वरला आणून भंगारवाल्याला सर्व बाटल्या विकत होती. रिक्षाटेम्पोतून बाटल्यांचे गोणते उतरवल्यानंतर टेम्पोचे भाडे चालकाच्या हातावर ठेवत होती. एवढा व्यवस्थित व्यवहार करणारी स्त्री मनोरुग्ण कशी असेल, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. मात्र ती मनोरुग्णच होती, यात संदेह नाही. भंगारवाल्याकडून मिळालेले पैसे ती सुरक्षितपणे ठेवायची आणि दररोज लागणारी दूध पिशवी, जेवणाचे साहित्य त्या पैशातून विकत घ्यायची. माभळे-संगमेश्वरमधील एकाही दुकानदाराकडून तिने एकही वस्तू कधी मोफत घेतली नाही. याचा अर्थ भीक मागून जगायचे नाही, तर कष्ट करून जगायचे हे तत्त्व ती मनोरुग्ण असूनही जोपासत होती.

या बाटलीवाल्या बाईकडे एक मोबाइल होता. त्यामध्ये सिमकार्ड नव्हते, मात्र त्याचा उपयोग ती गाणी ऐकण्यासाठी करायची. संगमेश्वरला आल्यानंतर तिने खास हेडफोनही खरेदी केले होते. ज्या भंगारवाल्याला ती प्लास्टिकच्या बाटल्या विकायची, त्याच्याकडेच ती मोबाइल चार्जिंगला लावत असे. मोबाइलवर गाणी ऐकायचे तिला कळत होते, तर मग बाटलीवाली बाई मनोरुग्ण कशी, असा प्रश्न पडतो खरा, मात्र ती मनोरुग्णच होती. दररोज सकाळी पैसे देऊन ती दुधाची एक पिशवी घेऊन यायची. दूध घेऊन आल्यानंतर ती चहा करून प्यायची. माभळे येथे महामार्गाच्या बाजूलाच तिने तीन दगड मांडून चूल तयार केली होती. आजूबाजूच्या पडलेल्या काटक्या गोळा करायच्या आणि विस्तव पेटवायचा, हा तिचा दिनक्रम होता. चुलीत विस्तवाच्या ज्वाला भडकल्या की बाटलीवाली बाईदेखील भडकायची आणि तिच्या भाषेत मोठमोठ्याने काहीतरी बोलत सुटायची. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर तिचे मन अस्वस्थ व्हायचे. मनात काहीतरी बदल्याची भावना निर्माण होत असावी. मात्र ती आपल्या भावना सांगणार कोणाला आणि ऐकणार तरी कोण? जेवण करण्यासाठी तिच्याकडे मोजकी भांडी होती. डाळ आणि भात असे वेगळ्या पातेल्यात करून ती रस्त्याकडेलाच जेवायला बसे. विशेष म्हणजे दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला ती ताजे जेवण करायचा आळस करत नसे. जेवण करण्यासाठी मोजका जिन्नस आणलेला असायचा. हे सारे साहित्य इतस्ततः विखुरलेले दिसायचे. काहीवेळा तिची एकटीचीच सुरू असणारी बडबड तिच्या अंतर्मनावर झालेल्या आघाताची जाणीव करून द्यायची. जेवत असताना तिच्या आजूबाजूला पाच-सहा भटकी कुत्री पंगतीला बसून तिच्या मनातील एकटेपणाची खंत संपवून टाकत. विशेष म्हणजे जेवताना ती या कुत्र्यांशी काहीतरी बोलतही असायची. तिने शिजवलेले निम्मे अन्न तर त्यांच्यासाठीच असायचे. स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी तिने जणू या श्वानांवर टाकून ती निर्धास्त झाली असावी. माणसांपेक्षा तिचा या मुक्या प्राण्यांच्या इमानदारीवर अधिक विश्वास बसला असावा.

फेब्रुवारीपासून गेल्या चार महिन्यांत या बाटलीवाल्या बाईने माभळे, संगमेश्वर येथून बावनदी आणि सावर्डेपर्यंत जाऊन हजारो बाटल्या गोळा केल्या. तिने त्या जमा केल्या नसत्या, तर यातील बऱ्याचशा बाटल्या पावसाळ्यात ओढ्यांच्या मार्फत नदीला जाऊन मिळाल्या असत्या आणि तेथून पुढे खाडी, समुद्रमार्गे परत किनाऱ्यावर आल्या असत्या. हजारो रिकाम्या बाटल्या गोळा करून तिने पर्यावरण संवर्धनाला नक्कीच मदत केली. पाऊस सुरू झाल्यानंतर ही बाटलीवाली बाई राहणार कोठे, उघड्यावर जेवण करणार कशी, या प्रश्नांबरोबरच कोकणात अतिवृष्टीचा रेड ॲलर्ट जाहीर झाल्यानंतर तर बाटलीवाल्या बाईची काळजी वाटून रामपेठ-संगमेश्वर येथील युवा कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी तिचे जेवण करतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. एखादी चांगली गोष्ट घडायची असेल तर एखादे निमित्त घडावे लागते. बाटलीवाल्या बाईच्या बाबतीत असेच घडले. या छायाचित्राकडे माभळे येथील रत्नागिरीस्थित युवा कार्यकर्ते अमित सामंत यांचे लक्ष गेले आणि मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानला या मनोरुग्ण महिलेविषयी सामंत यांनी कळविले. राजरत्नचे सचिन शिंदे माभळे येथे दाखल झाले आणि खरोखरच बाटलीवाल्या बाईचे नशीब पालटले. माभळे येथे आल्यानंतर सचिन शिंदे यांनी सर्वांच्या उपस्थितीत तिची बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एक कॅमेरा आणि चांगले स्वच्छ पंजाबी ड्रेस होते. बॅगेत असे स्वच्छ कपडे असताना ही महिला अशी का राहत असेल, या प्रश्नाची अनेक उत्तरे पुढे आली. एका प्लास्टिक पिशवीत तिचे बाटल्या विकून कमावलेले अडीच–तीन हजार रुपये होते. ही सारी मोहीम सुरू असताना बाटलीवालीचा भात रस्त्याकडेला चुलीवर शिजत होता. तिच्या आजूबाजूला पाच–सहा श्वान घुटमळत होते.

राजरत्नचे सचिन शिंदे, जया डावर आणि सौरभ मुळ्ये यांनी बाटलीवाल्या बाईचे सारे काही अत्यंत मायेने केले. तिच्या बॅगेतील एक चांगला ड्रेसही तिला घालायला दिला. हे सर्व होईपर्यंत बाटलीवालीचा भात शिजून तयार होता. रस्त्याकडेचे हे तिचे अखेरचे भोजन ठरावे, म्हणून सचिन शिंदे यांनी तिला जेवायला बसायला सांगितले. ती जेवायला बसल्यानंतर नेहमी तिच्यासमोर येऊन बसणारा श्वान यावेळीही येऊन बसला. त्याच्यासोबत काहीतरी बोलत तिने भात खाल्ला, थोडा श्वानांना घातला. हे सारे दृश्य पाहताना उपस्थितांची मने हेलावली. माभळे येथील हॉटेल व्यावसायिक साधना बेंडके यांनी बाटलीवालीला चहा आणून दिला. सारी मंडळी निघाल्यानंतर आपण जणू काही नातेवाईकांनाच निरोप देतोय, या भावनेने साऱ्यांच्या नेत्रकडा पाणावल्या.

मे महिन्यात दोन वेळा तरी संगमेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अविनाश सप्रे यांनी फोन करून या बाटलीवाल्या बाईबद्दल सांगितले होते. मात्र छायाचित्र घेऊन याचा पाठपुरावा करण्याचा योग येत नव्हता. अशा कामांना खरे तर विलंब करून चालत नाही, याबाबतचे अंजन बाटलीवाल्या बाईला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर आलेल्या रिपोर्टनंतर डोळ्यांत घातले गेले. जिल्हा रुग्णालयात तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी लक्षात आले की तिचे हिमोग्लोबिन सहाच्या खाली आले होते. ती माभळ्यातच राहिली असती, पावसात भिजली असती आणि तिला चक्कर आली असती, तर कदाचित तिचा मृत्यूही झाला असता. शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. सध्या जिल्हा रुग्णालायात कमालीची धावपळ सुरू असल्याने या मनोरुग्ण महिलेकडे कोणाचे बारीक लक्ष नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन ही महिला रुग्णालयातून पळाली आणि एकच धावाधाव सुरू झाली.
कमालीचा संततधार पाऊस अंगावर घेत राजरत्नचे सचिन शिंदे आणि त्यांचे सहकारी रात्री १२ वाजेपर्यंत रत्नागिरीच्या विविध भागात या बाटलीवाल्या बाईला शोधत होते. मात्र त्यांना यश आले नाही. सकाळी परत शोधमोहीम हाती घ्यायची, असे सर्वांनी ठरवले. रात्री रत्नागिरीतच कोठेतरी आसरा शोधून सकाळी साडेदहा वाजता बाटलीवाली बाई संगमेश्वरच्या दिशेने चालत जात असल्याचे निवळी येथील उतारात अविनाश सप्रे आणि किशोर प्रसादे यांनी पाहिले. तातडीने त्यांनी अमित सामंत यांना कळवले आणि सामंत यांनी राजरत्नच्या टीमला ही माहिती दिली. सचिन शिंदे गाडी घेऊन निवळीच्या दिशेने आले आणि त्यांनी बाटलीवालीला परत ताब्यात घेतले. सचिन शिंदेंना पाहून ती ‘बघा कसं फसवलं!’ अशा थाटात हसू लागली. बाटलीवालीला परत जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिला सलाइन लावण्यात आले. आता ती पळून जाणार नाही, याचीही काळजी घेतली गेली. चार दिवसांच्या उपचारांनंतर तिचे हिमोग्लोबिन वाढले आणि राजरत्नने तिला शासकीय मनोरुग्णालयात दाखल केले.

सध्या बाटलीवाल्या बाईवर मनोरुग्णालयात डॉ. आमोद गडीकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित लवेकर, डॉ. संजय कलकुटगी उपचार करत असून डॉ. नितीन शिवदे हे तिचे समुपदेशन करत आहेत. बाटलीवाल्या बाईला लवकरच तिचे कुटुंबीय मिळतील आणि तिच्या चेहऱ्यावर खरे हास्य उमटेल, अशी आशा करू या.

जीवन जगण्याच्या स्वप्नांचा ऐन उमेदीत चुराडा होतो, त्यावेळी मानवी मनाच्या संवेदना मूक होऊन जातात. मनातील साऱ्या इच्छा–आकांक्षा भोवऱ्याच्या वेगाने मेंदूला फिरवत राहतात. अशा वेळी माणूस स्वतःशीच बोलू लागतो, हातवारे करू लागतो, मधूनच किंचाळतो, वेगाने चालू लागतो.. त्याच्या या चालण्याला त्याच्या देहाच्या अंतापर्यंत अंत नसतो. कशाचीही पर्वा न करता चालत राहणे एवढेच त्याला माहीत असते. अशा अवस्थेत साऱ्या गरजा संपून जातात. शरीरात जीव आहे, म्हणून चालत राहायचे, एवढेच त्यांना माहीत असते. मनावर झालेल्या जबरदस्त आघातानंतर मेंदूवरील ताबा निघून गेलेल्या माणसाला आपण मनोरुग्ण असे म्हणतो. यातही काही स्वाभिमानी मनोरुग्ण असतात. मनोरुग्ण असूनही कोणाजवळ हात पसरायचा नाही. कष्ट करून स्वतःचे पोट भरायचे, अशा भावना असणे म्हणजे ही बाटलीवाली बाई मनोरुग्ण होण्यापूर्वी संस्कारक्षम जीवन जगली असल्याचा पुरावाच म्हटला पाहिजे. अशा माणसांच्या जीवनात पुन्हा पूर्वीचे दिवस येऊ शकतील? एक नवी आनंदी पहाट त्यांना परत अनुभवता येईल? त्यांना त्यांच्या कुटुंबात परतण्याचा आनंद मिळू शकेल? अशा विविध प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे समाजाने मनात आणले तर नक्कीच! मनोरुग्णांच्या भल्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचून मदत करू शकलो नाही, तरी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानसारख्या ज्या संस्था मनोरुग्णांसाठी आपुलकीने काम करत आहेत, त्यांना आवश्यक सहकार्य केले तरी ती एक प्रकारची सेवाच आहे.

  • जे. डी. पराडकर, संगमेश्वर
    jdparadkar@gmail.com
    (संपर्क – 9890086086)
    (राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांचा संपर्क क्रमांक – 8007841111
तीन दगडांची चूल मांडून जेवण करणारी बाटलीवाली बाई

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply