मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा

रत्नागिरी : चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

करोना महामारीत स्वतःची मुले आई-वडिलांचे मृतदेहदेखील ताब्यात घ्यायला तयार नाहीत. इतकी दहशत या आजाराने निर्माण केली आहे. परंतु चिपळूण येथे वास्तव्यास असणारे ताम्हाणे (ता. संगमेश्वर) येथील अस्लम मालगुंडकर हे एक मर्चंट नेव्ही अधिकारी करोनाला थेट भिडले आहेत. मूळ गाव संगमेश्वर तालुक्यात असल्याने त्यांनी सर्वाधिक काळजी आपल्या गावातील लोकांची घेतली. गोरगरीब तसेच घरात पुरुष माणसे नसलेल्यांना जेव्हा करोनाने ग्रासले, त्यावेळी अस्लमभाईंनी नोकरी, पद, इतकेच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाला बाजूला करून स्वतःला या कामात झोकून दिले. चिपळूणमधील लाइफकेअरचे हॉस्पिटलचे डॉ. समीर दळवी यांनी त्यांना उत्तम साथ दिली. संगमेश्वरमधून करोना रुग्ण आणायचे आणि थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे, हे एकच काम हा अधिकारी करत आहे कोणाकडे पैसे आहेत किंवा नाही, त्या रुग्णाचे नातेवाईक कुठे आहेत, पुढे काय करायचे, या प्रशांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ न घालवता त्या रुग्णाला जगवायचे आहे, हा एकमेव उद्देश समोर ठेवून या माणसाने अहोरात्र काम केले आहे.

रुग्णांना स्वतःच्या घरातून नाष्टा, जेवण तसेच त्यांच्या नातेवाईकांची काळजी अस्लमभाई जातीने घेत आहेत. आतापर्यंत ७० करोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये उपचार करून सुखरूप त्यांच्या घरी सोडण्याची कामगिरी या अधिकाऱ्याने करून दाखवली आहे. समुद्रात लाटांचा सामना करणाऱ्या या अधिकाऱ्याने थेट करोना मृतदेहांना खांदा देण्याचेदेखील धाडस दाखवले आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाउन काळात देवरूख, आंबवली, संगमेश्वरमधील अनेक गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही त्यांनी स्वखर्चाने केले. त्यांच्या या धाडसी समाजकार्याला शासकीय सेवेत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. नामीरा मालगुंडकर यांनीदेखील मोलाची साथ दिली आहे. अस्लमभाई मालगुंडकर यांच्या या सामाजिक सेवेचे अनेकांनी कौतुक केले आहे

या वेगळ्या कामाबाबत विचारले असता ते म्हणाले, लाटा या नेहमीच येत असतात. तो निसर्गाचा नियम आहे. आशा लाटांना घाबरून ध्येय सोडायचे नसते. ध्येय निश्चित असले की यश मिळणारच. हाच माझा आत्मविश्वास आहे. समाजावर संकट असताना मी नेव्ही ऑफिसर म्हणून मिरवण्यात अर्थच नाही. त्यापेक्षा संकटात सापडलेल्यांना सहकार्याचा हात देऊन उभे करणे हे ध्येय ठेवून मी काम करत आहे.

अस्लम मालगुंडकर यांचं मनोगत ऐका त्यांच्याच शब्दांत
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply