ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांचे करोना लसीकरण शक्य

मुंबई : भारतात येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या करोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केला आहे.

खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाउंडेशन आयोजित ‘इन्फोडोस’ या डिजिटल जनजागृती अभियानात ते बोलत होते.

‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ‘करोनाकाळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर डॉ. बकुळ पारेख यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला. डॉ. पारेख म्हणाले की, आत्तापर्यंत आपण १८ वर्षांवरील नागरिकांचे करोना लसीकरण करत आहोत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होऊ शकणाऱ्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लहान मुलांच्या करोना लसीकरणासाठी चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेत फायझर कंपनीने १२ वर्षांवरील मुलांवर करोना लसीकरणाच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. भारतातदेखील बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या बालकांवर सुरू आहेत. या चाचण्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचे करोना लसीकरण लवकरात लवकर करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या करोना लसीकरणाला भारतात सुरुवात होऊ शकेल. तसेच गरोदर महिलांचेही करोना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, त्यालाही लवकरच सुरुवात होईल, असेही डॉ. पारेख म्हणाले.

अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात डॉ. पारेख यांनी करोनाकाळात लहान मुलांचा आहार, मानसिक संतुलन, डेल्टा प्लस अशा विविध विषयांवरील जनतेच्या मनातील शंकांचे निरसन केले. करोनाकाळातील लहान मुलांची काळजी, या विषयावर यथोचित माहिती देणारे हे संपूर्ण चर्चासत्र खासदार राहुल शेवाळे यांच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे, अशी माहिती इन्फोडोसच्या वतीने देण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply