सावरकर राष्ट्रीय स्मारकाची अभ्यासकांसाठी पर्वणी

स्वा. सावरकरांशी संबंधित समकालीन देशी-परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील वृत्ते-लेखांचा संग्रह करण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे साकारला जाणार आहे. अभ्यासकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.
……
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व चरित्र वेगवान आणि कधी कधी सत्याहूनही अद्भुत अशा घटनांनी भरलेले आहे. स्वातंत्र्यवीर स्वत: कर्मयोग्याप्रमाणे सतत कार्यरत होते. या कार्यांमध्ये वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशाचे स्वातंत्र्य, नागरिकांमध्ये समता आणि हिंदूंमध्ये बंधुत्व असे हिंदुराष्ट्र आणि समाज घडवणे हाच त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे सावरकरांच्या प्रत्येक कार्याची दखल घेणे वृत्तपत्रांना भाग असे.

स्वातंत्र्यवीरांनी मार्सेलीस बंदरात सुटकेसाठी समुद्रातउडी मारून ब्रिटिशांच्या हातावर तुरी देण्याचा जो प्रयत्न केला, त्याने स्वत: सावरकर आणि भारतीय स्वातंत्र्याचा विषय एकदम जगभर चर्चेत आला. ब्रिटन आणि फ्रान्स या दोन महत्त्वाच्या राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय नैर्बंधिक प्रश्न बनल्याने सतत दोन वर्षे युरोप आणि अमेरिकेतील वृत्तपत्रांतून सावरकरांशी संबंधित अनेक लहानमोठ्या बातम्या येत होत्या. जीन लॉंगेट, मॅक्झिम गॉर्की यांच्यासारखे अनेक विचारवंत, पत्रकार, वकील आणि स्वातंत्र्यप्रेमी लेखक सावरकरांच्या बाजूने नियतकालिकांतून लेख लिहीत होते.


सावरकरांचे कार्य आणि स्मृती जपण्याच्या दृष्टीने या सर्व वार्तांची कात्रणे आणि लेख मिळवणे आणि त्यांचे जतन करणे महत्त्वाचे काम आहे. त्यातील बरीचशी दुर्मिळ झाली असली तरी सध्याच्या डिजिटलच्या काळामुळे उपलब्ध असलेली कात्रणे थोड्याफार प्रयत्नांनी मिळवणे काहीसे सुलभही झाले आहे. भारतात आणि अन्य देशांत काही कागदपत्रे आजही वेगवेगळ्या प्रकारच्या संग्रहालयांमधून जतन करून ठेवली गेली आहेत. ती सर्व स्मारकाच्या ग्रंथालयात एकत्रित करणे, त्यांची सूची करणे, आवश्यक वाटतील ती मुद्रित करणे आणि सावरकर स्मारकाला भेटी देणाऱ्या अभ्यासक आणि सावरकरप्रेमींना सहजी अभ्यासासाठी आणि पाहावयास मिळणे या गोष्टी या प्रकल्पातून साध्य होतील.
मार्सेलीसच्या धाडसी उडीनंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी सावरकर राजकारणात येऊ शकले. तेव्हाही स्वातंत्र्यवीरांनी एखाद्या कर्मवीराला साजेसे, सत्ता आणि लोकप्रितेच्या अतिरिक्त मोहाचा त्याग करून हिंदुसमाजाच्या हिताचे राजकारण करणे स्वीकारले. काही काळातच त्यांनी हिंदू महासभा या पक्षाला ऊर्जितावस्था आणली. तो अल्पमतातील पक्ष राहिला असला तरीही ब्रिटिश, काँग्रेस आणि मुस्लिम लीग या सर्व पक्षांना सावरकर आणि हिंदू महासभा यांची मते जाणून घेणे भाग पडले. त्यामुळे १९३७ ते १९४७ या काळातही अनेक देशी-विदेशी वृत्तपत्रांत सावरकरांशी संबंधित बातम्या अथवा लेख, मुलाखती येत राहिल्या.


सावरकरांच्या थोरवीच्या स्मृती त्यांच्या नावे असलेल्या राष्ट्रीय स्मारकात चिरस्थायी ठेवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या सर्व वार्ता आणि सर्व लेख मिळवणे आणि संग्रही ठेवून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हाती घेत आहे. स्मारकाचे कार्यकारिणी सदस्य सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने हे या प्रकल्पाचे प्रमुख असतील.

सावरकर स्मारकाच्या ग्रंथालयात सुमारे आठ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यात समकालीन वृत्तपत्रांतील बातम्या, लेख यांची भर पडेल. त्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण करत असतानाच आनुषंगिक उपयुक्त ग्रंथांची ग्रंथालयात भर टाकणे, स्मारकाचे ग्रंथालय अद्ययावत करणे आणि अभ्यासकांना प्रोत्साहन देणे, ऑनलाइन वर्गणीदारांसाठी आवश्यक तितके ग्रंथालय अधिक संगणकीकृत करणे अशा गोष्टी या प्रकल्पापाठोपाठ करण्याचा स्मारकाचा मानस आहे.

  • रणजित सावरकर
    कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply