शेतकरी १५ ऑगस्टपासून स्वतःच करू शकतील शेतीची पाहणी

रत्नागिरी : महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ‘ई-पीक पाहणी’ या स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येत्या १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी ॲपद्वारे त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतील. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.

ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. त्यामुळे ही पीक पाहणी अधिक अचूक आणि सोपी होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करायची आहे.

गेल्या ९ ऑगस्टपासून १४ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी प्रकल्प प्रशिक्षण प्रबोधन सप्ताह असून त्यादरम्यान याबाबतीत क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, ॲप हस्तांतर करण्यात येणार आहे. या ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रिअल टाइम माहिती पारदर्शकतेने संकलित होणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

या EPP APP च्या माध्यमातून शेतकऱ्याने आपल्या स्वताच्या फोटोसह (ऐच्छिक) एक वेळेस नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केल्यानंतर त्यांचा शेतातील उभ्या पिकाची पीकनिहाय, हंगामनिहाय आणि क्षेत्रनिहाय माहिती स्वयं घोषणेद्वारे अॅपमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाउस, पॉली हाउस, विहीर पड, इमारत पड यांसारख्या कायम पडचीदेखील नोंद करता येते. पिकाची अद्यावत आणि खरीखुरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाचे जिओटॅग्ड छायाचित्र काढायचे आहे. त्यामुळे अक्षांश, रेखांश, दिनांक आणि वेळ दर्शविली जाईल. शेतकऱ्याने नोंदविलेली त्यांच्या शेतातील पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी जमाबंदी आयुक्तांमार्फत तलाठ्यांसाठी मिडलवेअर ई-पीक ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमार्फत नोंदविण्यात आलेली माहिती महसूल विभागाकडे सुरक्षितरित्या जतन केली जाते.

ईपीपी अॅपमध्ये सर्वे क्रमांक, खातेक्रमांक, एकूण क्षेत्र, धारण प्रकार, संयुक्त, वैयक्तिक इत्यादी माहितीचा समावेश आहे. अॅपमध्ये पिकांची माहिती ऑफलाइन मोडमध्ये भरण्याची व्यवस्था आहे. महसूल आणि कृषि विभागाच्या समन्वयातून राज्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाचा हा पथदर्शी कार्यक्रम आखण्यात आला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply