food healthy agriculture market

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना; रत्नागिरी जिल्ह्यात १४१ जणांना मिळणार लाभ; आंबा पीक निश्चित

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ मिळणार आहे. यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपातही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. नवा उद्योग उभारायचा असल्यास तो केवळ आंबा प्रक्रिया उद्योग असणं बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. यातून लाभार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे भांडवली खर्च भागवता येऊ शकतात. इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून याबद्दलची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत इच्छुकांना मार्गदर्शन व साह्य करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून, त्यांची माहिती शेवटी दिली आहे.

योजनेची पार्श्वभूमी
स्थानिक पातळीवरच्या सूक्ष्म अर्थात छोट्या अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२०-२१मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबवायला सुरुवात केली असून, ती २०२४-२५पर्यंत चालणार आहे. राज्य सरकारांच्या सहकार्याने ही योजना राबवली जाते. सध्या देशाच्या ग्रामीण भागात सुमारे २५ लाख छोटे अन्नप्रक्रिया उद्योग आहेत; मात्र ते असंघटित स्वरूपाचे आणि एकदम छोट्या पातळीवरचे आहेत. कारण त्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पुरेसं भांडवल त्या उद्योजकांकडे नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मर्यादा आहेत. म्हणूनच सध्या अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पाठबळ पुरवणं हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच One District One Product या तत्त्वावर राबवली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातल्या मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसह सर्व ३६ जिल्ह्यांमध्येही योजना राबवली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुबलक उपलब्ध असलेल्या शेतीमालानुसार पीकउत्पादन निश्चित करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्चित करण्यात आलं आहे.

कोण लाभ घेऊ शकतं?
बेरोजगार युवक, महिला, प्रगतिशील शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारच्या भागीदारी संस्था यांपैकी कोणीही या योजनेचा वैयक्तिरीत्या लाभ घेऊ शकतं. स्वयंसाह्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शेतकरी गट किंवा शेतकऱ्यांची कंपनी आदींनाही गटांद्वारे या योजनेत सहभागी होता येऊ शकतं.

साह्य
वैयक्तिक लाभार्थी किमान १८ वर्षांचा असावा आणि किमान आठवी पास झालेला असावा, असा एक निकष आहे. गट किंवा कंपन्यांनाही या योजनेअंतर्गत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान दिलं जातं. त्याशिवाय या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसाह्यता गटातल्या सदस्यांना खेळतं भांडवल आणि छोटी मशिनरी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत प्रति सदस्याला ४० हजार रुपये बीजभांडवल रक्कम म्हणून दिले जाणार आहेत. सामाईक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी, इन्क्युबेशन सेंटरसाठी आणि ब्रँडिंग-मार्केटिंगसाठी आणि प्रशिक्षणासाठीही या योजनेअंतर्गत साह्य केलं जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठीही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. सध्या सुरू असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग एक जिल्हा एक उत्पादन या निकषात बसणारे नसले तरी चालू शकेल. नव्याने सुरू होणारे उद्योग मात्र एक जिल्हा एक उत्पादन या निकषानुसार ठरवण्यात आलेल्या उत्पादनाशी निगडित असावेत, असा नियम आहे. म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेऊन नवा उद्योग सुरू करायचा असल्यास केवळ आंबा प्रक्रिया उद्योगच सुरू करता येऊ शकेल.

इच्छुकांना www.pmfme.mofpi.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. वेबसाइटवर साइन अप करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा. त्यात आपली वैयक्तिक माहिती भरावी आणि कागदपत्रं अपलोड करावीत. सध्या काही उद्योग सुरू असल्यास त्याच्याशी निगडित माहिती, तसंच कर्जपुरवठा कोणती बँक करू शकते, याबद्दलची माहितीही भरावी लागते. अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करून मग इच्छुकांशी फोनवरून संपर्क साधला जाईल.

संसाधन व्यक्ती
अर्ज सादर करणं, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणं, कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणं अशा विविध कामांमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना साह्य करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा स्तरावर चार संसाधन व्यक्ती अर्थात रिसोर्स पर्सन्सची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक सोबत देत आहोत.
डॉ. आनंद तेंडुलकर – 9422632987
अमर पाटील – 7588065511
उन्मेश वैशम्पायन – 9422377150
शेखर विचारे – 9822056799

याशिवाय कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यासही योजनेविषयी अधिक माहिती दिली जाईल, असं रत्नागिरीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply