यश फाउंडेशनतर्फे रत्नागिरी शहर, परिसरात करोना लसीकरण – बाळ माने

रत्नागिरी : येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरातील १०० टक्के लोकांसाठी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजतर्फे करोनाप्रतिबंधक लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार आणि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी दिली.

यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजतर्फे येत्या उद्यापासून (दि. १ ऑक्टोबर) रत्नागिरी शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतींमधील नागरिकांसाठी लसीकरण केले जाणार आहे. रत्नागिरीतील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात हे लसीकरण होईल. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडून त्याकरिता कोविशिील्ड लस मोफतउपलब्ध झाली असून इतर संस्थाचेही त्यासाठी सहकार्य लाभले आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, जिल्ह्यात १० लाख लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे. करोनाची तिसरी लाट आल्यास त्याचा विपरीत परिणाम जास्त प्रमाणात होऊ नये, यासाठी सर्वांनी लस घेतली पाहिजे. त्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. रत्नागिरीत बोर्डिंग रोड येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. शिवाय दिवसाला किमान २०० च्या मागणीनुसार शिबिरे घेण्यात येणार आहेत. समाजातील गोरगरीब जनतेला ही लस दिली जाणार आहे.

कोंढवा (पुणे) येथील बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट, पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान, प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर), दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती बाळ माने यांनी दिली.

सध्या पाच हजार डोस उपलब्ध झाले आहेत. मागणीनुसार ते देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह सुरू आहे. त्याअंतर्गत रत्नागिरीतील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सुरवात केली जाणार आहे. ज्या नागरिकांना परदेशी जायचे आहे, त्यांनाही लस देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी (02352) 356033, तसेच व्हॉट्सअॅपसाठी 8208876273, 8087239377 किंवा 9545195333 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. रविवारीसुद्धा लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन आणि ऑनस्पॉट नोंदणी करणाऱ्यांना मोफत लस देण्यात येईल. सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, शिरगाव, कासारवेली, मिरजोळे, मजगाव, केळ्ये, फणसवळे, खेडशी, पानवल, कारवांचीवाडी, नाचणे, कर्ला, फणसोप, भाट्ये आणि गोळप या ग्रामपंचायत भागातील ग्रामस्थांनीही या मोहिमेचा लाभ घ्यावा. या ग्रामपंचायतींनी दररोज २०० लाभार्थ्यांची नावनोंदणी केल्यास गावातच लसीकरण शिबिर आयोजित केले जाईल. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. १ ते ३ ऑक्टोबर या काळात होणाऱ्या लसीकरणाकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्याकरिता संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी दि यश फाउंडेशन, रत्नागिरी या केंद्रांतर्गत अपॉइंटमेंट घ्यावी. नोंदणी करताना सशुल्क (Paid) असा पर्याय दिसला तरी सर्व डोस मोफत दिले जाणार आहेत. डोससाठी किंवा सेवाशुल्क म्हणून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. लसीकरण संपूर्णपणे मोफत आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply