मिसिंग वूमनला जीवदान करणाऱ्या `सेवाव्रती हळबे मावशीं`चे चरित्रात दर्शन – गणेश देवी

देवरूख : इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी या देवरूखच्या सावित्रीबाई होत्या. त्या काळात त्यांचा एकेक दिवस यातनेचा होता. त्यातूनच मातृमंदिर संस्थेची स्थापना झाली. त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेमुळे अनेक संभाव्य स्त्रीभ्रूण हत्या टळल्या. एका अर्थाने ‘मिसिंग वूमन’ला जीवदान मिळाले. मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी त्यांचे कार्यच त्यांच्या चरित्रातून पुन्हा सादर केले आहे, असे मत पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

सेवाव्रती हळबे मावशी या चरित्राचे प्रकाशन राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते आज देवरूख येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दुसऱ्याचे नुकसान करून केलेला विकास हा विकास होत नाही. ज्यावेळी सर्व पृथ्वी बेचिराख होईल, तेव्हा अश्रू ढाळण्यासाठी फक्त स्त्री उरेल. स्त्रियांचा सन्मान फक्त कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता आपल्या आयुष्यातच स्त्रियांचा सन्मान व्हावा. भारतात स्त्री दैवत असू शकते, भारतातल्या भाषांनाही मातेचा दर्जा दिला आहे. समाजातील सर्व लोक माझे आहेत, असे विचार रूढ झाले पाहिजेत. त्यानंतरच आपल्या देशात समानता, सर्व धर्म समभाव आहे, असे म्हणता येईल. विकासकामामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढत आहेत. इंदिराबाई हळबे मावशींनी मुलींना जन्माला येण्याची संधी दिली, ही संधी पुन्हा मिळावी हीच प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले की, मी मातृमंदिर संस्थेचा सेवक आहे. जेव्हा संस्थेत कामाला सुरुवात केली, तेव्हा मावशींबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. त्या काळात मावशी कशा काम करत असाव्यात, याचा विचार करता करता मी मावशींना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात रूढी-परंपरा, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावेळी त्यांनी ही संस्था स्थापन केली. हॉस्पिटल सुरू करण्याचा उद्देश पैसा कमावणे हा नव्हता. मावशींच्या प्रत्येक गोष्टीत वैचारिक उत्क्रांतीचा वाद होता. तो मावशींच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात दिसतो. मावशींनी मोठ्या प्रमाणात पाळणाघरे, बालवाड्या, बचत गट सुरू केले. खऱ्या अर्थाने पोषण आहाराची सुरुवात मावशींनीच केली. त्यासाठीच मावशी माझ्यासाठी आदर्शवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, राष्ट्र सेवा दलाचे प्रकाशनचे संदेश भंडारे मातृमंदिरचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक युयुत्सु आर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply