वॉटर प्युरिफायरसंदर्भात आजकाल वर्तमानपत्रांत, टीव्हीवर, नेटवर अनेक जाहिराती दिसतात. वॉटर प्युरिफायरचे समर्थन करणार्या बातम्या आणि विरोध करणाऱ्या बातम्यासुद्धा आढळत आहेत. त्यामुळे प्युरिफायरसंदर्भात सामान्य माणसाला संभ्रम निर्माण होईल, असे वातावरण आहे. तो संभ्रम दूर करण्याच्या हेतूने हा लेखनप्रपंच.
खरे तर बहुतांशी आजार हे अशुद्ध पाणी पिण्यामुळेच होतात, हे खरे आहे. पण पाणी शुद्ध करताना त्यातील अशुद्धतेबरोबर आवश्यक घटक नष्ट होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
आजकाल आर. ओ. वॉटर प्युरिफायरचा मोठा बोलबाला आहे. पण आर. ओ. म्हणजे नेमके काय, हे ग्राहकाला सोडाच, पण विक्रेत्यालाही धड सांगता येत नाही. जेथे अतिखोल बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो, फक्त तेथेच आर. ओ. वॉटर प्युरिफायरची आवश्यकता असते. अशा पाण्यामध्ये एकूण विरघळलेल्या क्षारांचे (TDS) प्रमाण अतिरिक्त असल्यास ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आर. ओ. वॉटर प्युरिफायरचा उपयोग केला जाऊ शकतो.
या प्युरिफायरमध्ये काही सेटिंग्ज असतात. त्या योग्य रीतीने हाताळणेदेखील आवश्यक आहे. आर. ओ. म्हणजे रिव्हर्स ऑसमॉसिस. यामध्ये उपलब्ध पाण्यातील क्षार कमी करण्याची सोय असते. पण मुळातच जर तुम्ही कमी खोल विहिरीचे किंवा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत असाल, तर त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमीच असते. असे पाणी शुद्ध करण्यासाठी आर. ओ. वॉटर प्युरिफायरचा वापर केल्यास कमी असलेल्या क्षारांचे प्रमाण आणखीनच म्हणजे आवश्यकतेपेक्षासुद्धा कमी होते. साहजिकच ते आरोग्यदायी ठरत नाही.
जेथे मुळातच पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी आहे, तेथे शुद्धीकरणासाठी यू. व्ही. (अल्ट्रा व्हायोलेट) किंवा यू. एफ. (अल्ट्रा फिल्टर) वॉटर प्युरिफायर वापरणे योग्य ठरते. या प्रकारचे प्युरिफायर पाण्यातील क्षारांचे प्रमाण कायम ठेवून शुद्धीकरण करतात.
क्वचित काही ठिकाणी अगदी बोअरवेलच्या पाण्यामध्येदेखील क्षारांचे प्रमाण मध्यम आढळते, तेथेदेखील यू. व्ही. आणि यू. एफ. वॉटर प्युरिफायरचा उपयोग शुद्धीकरणासाठी केला जाऊ शकतो.
आपण आपल्याकडील उपलब्ध पाण्यातील क्षारांचे प्रमाण TDS METER द्वारे तपासून घेऊ शकतो. बर्याच ठिकाणी हे उपकरण उपलब्ध आहे. या तपासणीनंतर नक्की कोणता वॉटर प्युरिफायर घ्यायचा, हे आपण ठरवू शकतो.
थोडक्यात वॉटर प्युरिफायरचा वापर धोकादायक असूच शकत नाही, मात्र वॉटर प्युरिफायरची आवश्यकतेनुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे. चुकीची निवड आरोग्यास अपायकारक ठरू शकते.
टीप :
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यासारख्या तालुक्यात (जेथे औद्योगिकीकरणामुळे होणारे जलप्रदूषण फारसे नाही, तसेच समुद्रदेखील फार जवळ नाही, आणि सुदैवाने क्षारांचे प्रमाणदेखील काही अपवाद वगळता अतिरिक्त नाही) अशा बहुतांश ठिकाणी आर. ओ. ऐवजी यू. व्ही. किंवा यू. एफ. वॉटर प्युरिफायरचा वापर करणे हितावह आहे.
आर.ओ.पेक्षा यू. व्ही.चा आणि यू. व्ही. पेक्षा यू. एफ.चा देखभाल खर्चही तुलनेने कमी येतो.
© Sukhanand Kulkarni
(B. E. Electronics)
Proprietar :
Manish Solutions
(Domestic Appliances), Lanja
(संपर्क : 99705 93910)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड