रत्नागिरी : दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कोविड काळात उत्तम कार्य केले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपली समाजाला गरज आहे. समाजात गोरगरीब लोक आहेत. त्यांना लस द्यायची आहे. त्यासाठी योगदान करा. कॉलेजच्या परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे लावून हा परिसर हिरवागार करा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
रत्नागिरीत सावरकरांच्या हिंदुत्वविषयक विचारांविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी आलेले राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी माजी आमदार बाळ माने संचालित दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी श्री. कोश्यारी यांचा शाल, श्रीफळ आणि चांदीची गणपतीची मूर्ती देऊन सन्मान केला. या सन्मानाने आपण भारावून गेल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवीताई माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त मिहिर माने, आर्किटेक्ट कस्तुरी माने व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी श्री. माने म्हणाले, कोकणात नर्सिंग शिक्षणात योगदान असलेल्या दि यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजची स्थापना १५ वर्षांपूर्वी केली. आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिकून आरोग्य यंत्रणेत योगदान करत आहेत. सध्या येथे ३५० विद्यार्थिनी शिकत आहेत. बेटी पढाओ, बेटी बचाओ याअंतर्गत कॉलेजने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. विद्यार्थिनींनी कोविडच्या काळात चांगली सेवा दिली. सिरम इन्स्टिट्यूट, जनकल्याण समिती, मुकुल माधव फाउंडेशन आणि दि यश फाउंडेशनच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
यावेळी साप्ताहिक बलवंतच्या अंकाचे कौतुकही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. लवकरच शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आणि स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार असलेल्या सा. बलवंतबद्दल संपादक या भूमिकेतून बाळ माने यांनी माहिती दिली. यंदा दिवाळी अंकही खुमासदार आहे. त्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समोर ठेवून विविध लेख प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
कार्यक्रमाला कॉलेजच्या रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्रा. चेतन अंबुपे, प्रा. रमेश बंडगर, ग्रंथपाल सौ. मानसी मुळ्ये, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात नवचैतन्य पाहायला मिळाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविद्यालयासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड