सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२५ ऑक्टोबर) केले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत भारतीय इतिहास संशोधन परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘Dismantling Casteism : Lessons from Savarkars Essentials of Hindutva’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात केले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली, तरी आजही भारतात काही गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता नष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचं आणि गौरवपूर्ण आहे. सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होत आहे, ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.’

या वेळी व्यासपीठावर गुरू घासीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेचे रणजित सावरकर
‘आयसीएचआर’चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. उमेश अशोक कदम यांनी या परिषदेची संकल्पना, स्वा. सावरकरांचे विचार आणि कार्ये समजून घेण्याची आवश्यकता विशद केली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले विचार मांडले. भारतीय इतिहास संशोधन परिषदचे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या उद्घाटन सोहळ्याला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रा. हिमांशू चतुर्वेदी, डॉ. नीरज श्याम देव, अक्षय जोग, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी, रत्नागिरीतील सावरकरप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ‘आयसीएचआर’च्या सहायक संचालिका डॉ. नुपूर सिंग यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply