रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘महासंचालक गौरव सन्मान’ येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिरात प्रदान करण्यात आला. प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या त्या भारतातील प्रथम मानकरी ठरल्या आहेत.
लेफ्टनंट कमांडन्ट एम. एम. सईद यांच्या हस्ते कॅप्टन कदम यांना देण्यात आलेले ‘एनसीसी’च्या महासंचालकांचे प्रशस्तीपत्र आणि पदक या स्वरूपातील हा पुरस्कार एनसीसी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. रत्नागिरी पालिकेचे शिक्षणाधिकारी सुनील पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशसेवेच्या प्रेरणेने झपाटलेल्या प्रशिक्षणार्थीच्या समवेत काही क्षण घालवता आले, याचा आनंद व्यक्त करत श्री. पाटील म्हणाले की देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी योग्य असे तरुण येथे पाहायला मिळाले.
माझ्या कार्याची वरिष्ठांनी स्वतःहून दखल घेऊन माझी पुरस्कारासाठी निवड केली, याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे म्हणत कॅप्टन सीमा कदम यांनी आपला पुरस्कार ज्यांच्यामुळे हातून चांगले काम झाले ते एनसीसी छात्र आणि कुटुंबातील सदस्य यांना अर्पण केला. आपल्याला हा जीवन गौरव पुरस्कार फार लवकर मिळाला, याचा अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या. कॅप्टन सीमा कदम या रत्नागिरी येथील एनसीसी विभागातील पहिल्याच महिला अध्यापक असून गेली चौदा वर्षे त्या या विभागाच्या सेवेत आहेत.
‘एनसीसी’ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी विविध सन्मानांनी गौरविण्यात आले. यामध्ये रोहित माने (महासंचालक राष्ट्रीय सन्मान), देवरूखच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातील विराज विलास सुर्वे आणि पाटील वरक (सुवर्णपदक), रणवीर जाधव (सांघिक सुवर्णपदक), डी. डी. शिंदे महाविद्यालयाची सानिया मोमीन (रौप्यपदक) आणि अनेक ट्रॉफी विजेत्या छात्रांचा समावेश होता. या शिबिराच्या संयोजनासाठी सहकार्य आणि परिश्रम करणारे कर्मचारी, सेवक, एनसीसी कार्यालयातील कर्मचारी, सेवक, आचारी आणि पत्रकार यांनाही गुलाबपुष्पे देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरणापाठोपाठ एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. सिद्धी भुजबळराव हिने गणेशस्तोत्र, ज्ञानेश्वरी वाडेकरने गणेशवंदन नृत्य, वैभवी पाटील हिने लाठी फिरवण्याची कला सादर केली. सपना शिवगण या विद्यर्थिनीने आपल्या पथकासह सावित्रीबाई फुले यांच्या महिलांना शिकविण्याच्या कार्यगौरवाचा पोवाडा सादर केला. साक्षी यादव आणि साथी यांनी गायिलेल्या देशभक्तिपर गीताने गुणदर्शन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला रत्नागिरी पालिका शाळा क्रमांक १७ चे मुख्याध्यापक श्री. कासार व सहकारी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड