अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळामार्फत रत्नागिरीत १० ते १६ डिसेंबरला कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळामार्फत दहाव्या कीर्तन सप्ताहाचे आयोजन येत्या शुक्रवारपासून (दि. १० डिसेंबर) १६ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षांत करोना महामारी, टाळेबंदीमुळे श्रावण महिन्यात कीर्तन सप्ताह आयोजित करता आला नाही. त्यामुळे कीर्तनप्रेमींच्या आग्रहास्तव मार्गशीर्ष महिन्यात सप्ताह होणार आहे.

दररोज कीर्तने सायंकाळी ५ ते ७ या वेळात रत्नागिरीत जोशी पाळंद येथील मंडळाच्या ल. वि. केळकर मुलांच्या वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहात होणार आहेत. कीर्तन सप्ताहात पायपेटीसाथ निरंजन गोडबोले, तबलासाथ सुयश जोशी, केदार लिंगायत करणार आहेत. जास्तीत जास्त कीर्तनप्रेमींनी कीर्तनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन आणि पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

कीर्तनांचा तपशील असा – शुक्रवारी १० डिसेंबरला रत्नागिरीच्या हभप विशाखा भिडे न्यायशास्त्री रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तन करतील. रत्नागिरीतील पहिल्या महिला कीर्तन अलंकार सौ. भिडे यांनी कीर्तनाचे सुरवातीचे शिक्षण कै. भास्करबुवा घैसास यांच्याकडे, तर संगीत शिक्षण उज्ज्वला पटवर्धन यांच्याकडे घेतले. रत्नागिरीत आल्यावर कीर्तन मार्गदर्शन हभप नाना जोशी यांनी केले आहे.

शनिवारी ११ डिसेंबरला हभप मकरंद करंबेळकर (पुणे) गजगौरी या आख्यानविषयावर कीर्तन करतील. श्री. करंबेळकर यांनी कालिदास विश्वविद्यालयातून कीर्तनशास्त्रातून एमए पदवी संपादन केली. गेल्या १८ वर्षांपासून ते कीर्तने करत असून त्यांना कीर्तन विशारद पुरस्कार मिळाला आहे. भारतभर अनेक ठिकाणी कीर्तन, प्रवचन, श्रीमद भागवत सप्ताह त्यांनी केले.

रविवारी १२ डिसेंबरला हभप गौरी खांडेकर (पुणे) श्रीराम अयोध्या पुनरागमन हा आख्यान विषय कीर्तनातून सादर करतील. त्यांना कै. श्रीधरबुवा भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. बीई (आयटी)चे शिक्षण घेतलेल्या गौरी इन्फोसिसमध्ये नोकरीस आहेत. गेली १३ वर्षे त्यांनी मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात कीर्तने केली आहेत.

सोमवारी १३ डिसेंबरला गोमंतकीय युवा कीर्तनकार हभप दिव्या मावजेकर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि हभप शिवानी वझे (गोवा) या महिषासुर मर्दिनी यांच्यावर प्रत्येकी एक तास कीर्तन करतील. त्या चक्री कीर्तन कार्यक्रम सादर करतील. फोंडा (गोवा) कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य हभप सुहास वझे यांच्या या विद्यार्थिनी आहेत.

मंगळवारी, १४ डिसेंबरला रत्नागिरीच्या हभप सायली मुळ्ये दुर्गा द्रौपदी हा आख्यान विषय मांडतील. त्यांनी बीए (पत्रकारिता), कीर्तन विशारद, गायन विशारद पदव्या मिळवल्या आहेत. हभप नंदकुमार कर्वे (पनवेल), हभप महेश काणे (चिपळूण), नाना जोशी कुटुंबीय हे त्यांचे कीर्तनातील गुरू आहेत. त्यांनी कीर्तन विशारद परीक्षेत प्रथम क्रमांक, राष्ट्रीय कीर्तन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बुधवारी, १५ डिसेंबरला हभप दत्तात्रय बिवलकर (नांदिवडे) दामाजीपंत या आख्यानविषयावर कीर्तन करणार आहेत. दत्तात्रय बिवलकर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असून १९८६ पासून कीर्तन सेवा करत आहेत. सुरवातीला तबला, पेटीशिवाय कीर्तन करित असत. आतापर्यंत एक हजार कीर्तने केली आहेत.

गुरुवारी, १६ डिसेंबरला हभप अभय घांग्रेकर (भिवंडी, ठाणे) नाथांना श्री दत्तदर्शन हा विषय कीर्तनातून मांडतील. अभय घांग्रेकर बॅंकेत नोकरीस असून गायन, हार्मोनियम वादन आणि २०१० पासून कीर्तनसेवा करीत आहेत. (कै.) दत्तदासबुवा घाग हे त्यांचे कीर्तनातील आदर्श आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply