पत्रकारांची जबाबदारी

मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारितेविषयीचा बराच मोठा ऊहापोह गेल्या काही दिवसांत झाला. पत्रकारितेचा प्रवास, काळानुरूप बदलत गेलेले पत्रकारितेचे स्वरूप, बदलते तंत्रज्ञान, आधुनिक प्रसारमाध्यमांच्या कोलाहलात पत्रकारितेचे भवितव्य अशा अनेक विषयांची चर्चा झाली. अलीकडे समाजमाध्यमांचा मुख्य प्रसारमाध्यमांवर झालेला परिणाम हा तर मोठाच चर्चेचा विषय होता. मात्र काही मूलभूत बाबतीत आपण पत्रकारही विचार करायला कसे तयार नाही, आपली तयारी किती कच्ची आहे, माहिती या आपल्या मूळ गाभ्याचा पायाच किती कच्चा आहे, याची जाणीव झाली. अगदी मोठ्या थाटात, भरगच्च कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकरांच्या नावे पत्रकार दिन साजरा करणाऱ्यांना मराठी पत्रकारितेच्या उद्गात्याची जन्मतारीख माहीत नसते. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू झाले. तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, ती बाळशास्त्रींची जन्मतारीख नव्हे, हे पत्रकारांना माहीत नसते. दर्पण हे साप्ताहिक किंवा दैनिक नव्हे, तर पाक्षिक होते, याची माहिती आधुनिक म्हणवून घेणाऱ्या पत्रकारांच्या गावीही नसते. याच चुकीच्या माहितीचा उद्घोष पत्रकार दिनाच्या विविध ठिकाणच्या व्यासपीठांवर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

बाळशास्त्रींविषयीची माहिती हा तर इतिहास झाला. तो विविध ठिकाणी ग्रथित झालेला आहे. तो वाचण्याची तसदी आपण घेत नाही, म्हणून आपण चुका करतो, हा भाग वेगळा. पण वर्तमानात आपण योग्य माहिती संकलित करावी, असेही काही अपवाद वगळता पत्रकारांना वाटत नाही, हे गंभीर आहे. त्याची अगदी मोजकी उदाहरणे देता येतील. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष देव यांचे नुकतेच निधन झाले. निधनाची बातमी समजताच बातमीसाठी त्यांचा परिचय देण्याची वेळ आली. तेव्हा फोनाफोनी सुरू झाली. सबसे तेज प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याच माध्यमाच्या बातमीमध्ये त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. त्यांची जन्मतारीख, ते किती काळ प्राचार्य होते, त्यांनी वेगळे कोणते काम केले, त्यांचे लेखन याविषयी कोणताच उल्लेख त्या पहिल्या वहिल्या बातम्यांमध्ये नव्हता. विशेष म्हणजे आज रत्नागिरीत पत्रकारिता करणारे अनेक जण त्यांचे विद्यार्थी आहेत. असाच काहीसा प्रकार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार बाळ भिसे यांच्या निधनावेळीही घडला होता. त्यांचा परिपूर्ण परिचय, त्यांचे वय, त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याचा उल्लेख अनेकांच्या ताज्या बातमीमध्ये नव्हता. इतकेच काय, त्यांचे चांगले छायाचित्रही कोणाच्या बातमीसोबत दिले गेले नव्हते. हे लिहीत असतानाच रत्नागिरीतील प्रख्यात लेखिका स्मिता राजवाडे यांचे मंगळूर येथे निधन झाल्याची बातमी आली. आता त्यांचे छायाचित्र आणि समग्र माहिती कशी मिळणार, हा प्रश्न पत्रकारांसमोर आहे. नेमकी माहिती मिळाली नाही, की मग ऐकीव माहितीवर आधारित बातमी दिली जाते. अशा घटनेचा एक दिवस उलटून गेला की, नंतर साऱ्यांनाच त्याचा विसर पडतो. ही खरेच गंभीर बाब आहे.

पत्रकारितेपुढच्या आव्हानांचा विचार करताना झटपट पत्रकारितेच्या आजच्या काळात योग्य माहितीचे संकलन करण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. पत्रकारितेला समाजाचा आरसा मानले जाते. त्यांना समाजाचे शिक्षकही समजले जाते. हा आरसा आणि शिक्षकाची भूमिका पार पाडण्याची योग्यता मिळवायची असेल, तर पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे. ती त्यांनी पार पाडायला हवी आहे. समाजातल्या इतर घटकांचा गौरव करण्याचे समारंभ आयोजित करण्यापेक्षा अशी मूलभूत माहिती संकलित करण्याचे काम पत्रकारांनी गांभीर्याने करायला हवे. झटपट पण अर्धवट आणि अपुरी माहिती देऊन समाजाची दिशाभूल करणारी पत्रकारिता थांबवायला हवी.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ जानेवारी २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २१ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply