राज्यातील नाट्यगृहे नमन लोककलेला सवलतीत देण्याची मागणी

मुंबई : रंगभूमीवर इतर लोककला सादरीकरणाला जी सवलत दिली जाते, तीच रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेलाही राज्यभरातील नाट्यगृहांमध्ये मिळावी, अशी मागणी नमन लोककला संस्थेतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात परळ (मुंबई) येथील दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाकडे करण्यात आली.

कोकणातील नमन ही लोककला मुंबईतही लोकप्रिय आहे. या लोककलेला महाराष्ट्राची लोककला म्हणून राजमान्यता मिळावी, यासाठी नमन लोककला संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे नमन लोककला आणि लोककलावंतांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्या शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. त्याच अनुषंगाने नाट्यगृहांच्या भाड्यातील सवलतीविषयी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यगृहे आणि रंगभूमीवर इतर लोककलांच्या सादरीकरणाला सवलतीच्या दरात भाडे आकारले जाते. नमन लोककलेला मात्र ती सवलत दिली जात नाही. ही तफावत लक्षात येताच नमन लोककला संस्थेने सवलत मिळण्यासाठी आग्रही प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत मुंबईत परळ येथील दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली. नमन मंडळे, कलापथके, लोककलावंतांना नाट्यगृहात येत असलेल्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. रंगभूमीवर इतर लोककला सादरीकरणाला जी सवलत दिली जाते, तीच नमन लोककलेलाही मिळावी, अशी मागणी करण्यात आली. दामोदर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बैठकीला संस्थेचे सचिव सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष रमाकांत जावळे, चंद्रकांत साळवी, सौ. संगीता पांचाळ-बलेकर, विजय साळवी, सुभाष धनावडे, अमित काताळे, शशिकांत भारती, दीपक वेलुंडे, सुरेश मांडवकर, पत्रकार आणि कार्यकारिणी सदस्य उदय दणदणे (गुहागर) आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply