मत्स्यगंधा – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१६ मार्च २०२२) – मत्स्यगंधा
सादरकर्ती संस्था – कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे, ता. रत्नागिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १६ मार्च २०२२ रोजी मत्स्यगंधा हे नाटक कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे, ता. रत्नागिरी या संस्थेने सादर केले.

हौशी होतकरू कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळावी, हाच राज्य नाट्य स्पर्धेचा शासनाचा उद्देश आहे. तोच प्रयत्न कलारंग नाट्यप्रतिष्ठान ही संस्था सातत्याने गेली सहा वर्षे करीत आहे.

याआधी या संस्थेने रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षे नवोदित आणि ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देऊन नाटक सादर करून अनेक बक्षिसे मिळवली आहेत. गेल्या वर्षीच्या ५९व्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत वैयक्तिक सहा बक्षिसांसह सांघिक तृतीय पारितोषिक पटकावले आहे.

यावर्षी सत्यवती साकारणाऱ्या कु. किमया सोहनीसह तीन नवोदित कलाकारांना संस्थेने संधी दिली आहे. तालरक्षक कु. अथर्व आठल्ये याच्या रूपाने साथसंगतीतही नवोदित कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न संस्थेने आणि दिग्दर्शक नितीन जोशी यांनी कायम ठेवला आहे. कु. ऋग्वेद जोशी आणि कु. मुकुल रिसबूड ही मुले पार्श्वसंगीताची जबाबदारी पार पाडत आहेत. ही मुले तसेच नवोदित कलाकार ग्रामीण भागातील आणि होतकरू आहेत.

संस्थेसाठी सतत झटणारे अमेय धोपटकर हे प्रकाशयोजना करणार आहेत. उपाध्यक्ष अरुण जोशी नेपथ्य साकारत आहेत. दत्तात्रय जोशी याहीवर्षी ऑर्गन साथ करीत आहेत. कु. अपूर्वा जोशी ध्वनिसंकलन करणार आहेत. गणेश साठे, अवधूत काळे, शेखर भडसावळे आणि अध्यक्ष दत्तात्रय बिवलकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. किरण जोशी आणि विलास हर्षे सर यांनी भक्कम साथ दिली आहे.

महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना मत्स्यगंधा या नाटकात मांडण्यात आली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांचे हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले. महाभारतातील हे कथानक देवव्रत अर्थात भीष्माचार्य आणि त्यांच्या वडिलांची अर्थात राजा शंतनूची पत्नी सत्यवती अर्थात मत्स्यगंधा यांच्या जीवनावर आधारित आहे. पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते. तिच्या निष्ठुर सूडबुद्धीचे अतिशय घातक परिणाम तिच्यासह देवव्रताला आणि खुद्द सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात. राजा शंतनूने सत्यवतीला विवाहाची गळ घातली आणि सत्यवतीच्या बापाने, धीवर राजाने सत्यवतीचाच पुत्र गादीवर बसावा अशी अट टाकली आणि ती मान्य होण्यासाठी भीष्माने आजन्म ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा केली. तत्पूर्वी सत्यवतीला पराशर ऋषीपासून पुत्र झाला होता आणि पराशर त्याला घेऊन गेला होता, अशी मूळ कथा आहे. नाटकात कानेटकरांनी धीवर राजाऐवजी थेट स्वतः सत्यवतीच आपला पुत्र हस्तीनापूरच्या गादीवर बसावा ही अट शंतनूला घालते, असे दाखवून एका वेगळ्या नाट्याला जन्म दिला आहे. या नाट्याच्या मुळाशी एका स्त्रीच्या स्वप्नभंगाची व्यथा नाट्यमयतेने गुंफलेली आहे. सत्यवतीने पराशराशी स्वेच्छेने रत झाल्यावर त्याच्याशीच संसार करण्याचे स्वप्न पाहिले, पण संन्यस्तवृत्तीच्या पराशराने संसाराच्या मोहापासून परावृत्त होत हिमालयाची वाट धरली. सत्यवतीच्या कोवळ्या प्रेमभावना भस्मसात झाल्यावर त्यातून एका वेगळ्याच महत्त्वाकांक्षी आणि निष्ठूर स्त्रीचा जन्म झाला आहे. तिच्या मनात पुरुषाच्या भोगलालसेविषयी आणि त्यातल्या अप्पलपोटेपणाविषयी घृणा निर्माण होते. ती शंतनूच्या मागणीकडे एक सौदा म्हणून बघू लागते. त्यातूनच तिची अट जन्म घेते आणि त्या अटीपाठोपाठ तिची शोकांतिका आकार घेते. विवाहापूर्वीच पराशरापासून झालेला पुत्र म्हणजेच व्यास तिच्या भेटीला येतो आणि नाटकाचा पडदा पडतो.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी १४ मार्च रोजी मत्स्यगंधा याच नाटकाचा प्रयोग झाला होता. तो सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स संस्थेने सादर केला होता. आता वेगळ्या संस्थेतर्फे वेगळ्या कलाकारांनी सादर केलेला प्रयोग आज रसिकांना पाहायला मिळणार आहे. आजच्या नाटकाचे आणखीही एक वैशिष्ट्य आहे. सावंतवाडीच्या नाटकात भीष्माची भूमिका साकारणारे बाळ पुराणिक यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे तिसऱ्या प्रवेशात काम करता आले नाही. आज सादर होणाऱ्या नाटकाचे दिग्दर्शक नितीन जोशी यांनी ती भूमिका पार पाडली. स्पर्धेपलीकडे जाऊन कलाकार म्हणून शो मस्ट गो ऑन हा वाक्प्रचार श्री. जोशी यांनी खरा करून दाखवला. विशेष म्हणजे ज्या नाटकादरम्यान त्यांनी आपले कलाकाराचे कर्तव्य निभावले, तेच नाटक आज त्यांच्या दिग्दर्शनाखाली रसिकांच्या भेटीला येत आहे.

श्रेयनामावली :
लेखक – प्रा. वसंत कानेटकर
मूळ संगीत – स्व. पं. जितेंद्र अभिषेकी

दिग्दर्शक : नितीन जोशी
संगीत मार्गदर्शन : विलास हर्षे
नेपथ्य : अरुण जोशी
रंगभूषा : जयंत नाटेकर, गोवा
वेशभूषा : दत्तात्रय बिवलकर, लता कटनाक
ध्वनी : अपूर्वा जोशी
रंगमंच व्यवस्था : अवधूत काळे, गणेश साठे, शेखर भडसावळे, अनिल चौघुले, दत्तात्रय भातडे
पार्श्वसंगीत : ऋग्वेद जोशी, मुकुल रिसबूड
प्रकाशयोजना : अमेय धोपटकर
ऑर्गनसाथ : दत्तात्रय जोशी
तबला : अथर्व आठल्ये

भूमिका आणि कलावंत :

भीष्म- केतन गोगटे
पराशर- गिरीश जोशी
शंतनु- चेतन जोशी
प्रियदर्शन- केतन कवठेकर
धीवर- अरुण जोशी
चंडोल- प्रथमेश शहाणे
अंबा- कु. पूर्वा जोगळेकर
सत्यवती कु. किमया सोहनी

स्पर्धेचे वेळापत्रक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply