रत्नागिरीत चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे २९ जुलैपासून श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. २९ जुलै) ते ४ ऑगस्टपर्यंत मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कीर्तने होतील. सप्ताहाचे हे ११ वे वर्ष आहे.

यावर्षी पनवेल, पुणे, गोवा, संगमेश्वर, अलिबाग येथील नामवंत कीर्तनकार कीर्तनसेवा रुजू करणार आहेत. पहिले पुष्प २९ जुलै रोजी पनवेलचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप अनंत उर्फ नंदकुमार कर्वे रंगविणार आहेत. चित्रसेन गंधर्व (कृष्णार्जुन युद्ध) हा त्यांच्या आख्यानाचा विषय आहे. श्री. कर्वे यांनी अ. भा. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद (हार्मोनियम) आणि संगीत अलंकार (गायन) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. सुमारे ३१ वर्षे त्यांनी रसायनी येथील एचओसी स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून सेवा बजावली. संगीतकार, मार्गदर्शक, कवी, हार्मोनियमवादक म्हणून सुपरिचित आहेत. १९८४ पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक या ठिकाणी त्यांची कीर्तने झाली आहेत. आशाकिरण मानव सेवा, कीर्तनरत्न, पूर्णवादी कीर्तनकार, कीर्तन भूषण, कीर्तन भास्कर या पदव्यांनी ते सन्मानित आहेत.

पुण्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप उद्धवबुवा जावडेकर ३० जुलै रोजी नागिण या आख्यान विषयावर कीर्तन करतील. कीर्तनकलानिधी श्री. कोपरकरबुवा, कीर्तनसम्राट गोविंदस्वामी आपळे, करवीर पीठाधीश शंकराचार्य महाराज (कऱ्हाडकर बुवा) हे त्यांचे कीर्तनातील गुरू होत. गेल्या ४० वर्षांत त्यांनी सुमारे ६५०० कीर्तने ठिकठिकाणी केली. नारद विद्यामंदिर (पुणे) येथून त्यांनी कीर्तनाचा ६ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांची कीर्तने सादर झाली. कीर्तनभास्कर, कीर्तनसूर्य, कीर्तनगौरव अशा पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

गोव्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हभप केशव माधव शिवडेकर ३१ जुलै रोजी स्थालीहरण या आख्यान विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. श्री समर्थ रामदास प्रतिष्ठान संचालित कीर्तन विद्यालय (कवळे), कपिलेश्वरी (फोंडा, गोवा) येथे त्यांचे कीर्तन अध्ययन झाले. कै. हभप रामचंद्रबुवा कऱ्हाडकर, करवीर पीठाधीश ब्रह्मीभूत विद्याशंकर भारती स्वामी, हभप श्रीपादबुवा ढोल्ये, कीर्तनकलानिधी हभप अनंतबुवा मेहेंदळे, हभप नारायणशास्त्री गोडबोले, हभप दत्तदास घागबुवा हे त्यांचे कीर्तनातील गुरू आहेत. काही वर्षे तबलावादनाचे शिक्षणही त्यांनी घेतले. वेदशास्त्रसंपन्न न्यायचूडामणी पुरुषोत्तमशास्त्री शिकेरकर यांच्याकडून त्यांनी वेदाध्ययनाचे धडे घेतले. पणजी आकाशवाणीची त्यांना बी हाय ही ग्रेड प्राप्त आहे. कीर्तन स्वरताल धुरंधर या पदवीने ते सन्मानित आहेत.

पुण्याच्या हभप डॉ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक आख्यान विषयावर कीर्तन सादर करतील. त्यांचे संगीतातील शिक्षण गुरू व आई डॉ. श्रुती देशपांडे यांच्याकडे झाले, तर कीर्तनाचे मार्गदर्शन वडील डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्याकडे लाभले. पुणे, औरंगाबाद आकाशवाणी केंद्रांच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. पुण्याच्या नारदमंदिरचा युवती कीर्तनकार पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्या २००९ पासून संतकवी दासगणु महाराजांच्या कीर्तन परंपरेचा महाराष्ट्रभर प्रसार, प्रचार करत आहेत. आधुनिक महीपती संतकवि श्री दासगणु महाराजांच्या कीर्तनाख्यानातील सांगीतिक आयामांचा चिकित्सक अभ्यास या विषयातील संशोधन कार्याबद्दल त्यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

रेवदंडा (अलिबाग) येथील हभप संदीप केळकर २ ऑगस्ट रोजी कीचकवध या विषयावर कीर्तन सादर करतील. केळकर यांचे कीर्तनातील गुरू वडील हभप वामनबुवा केळकर असून ते तबला, गायन आणि कीर्तन विशारद आहेत. कीर्तन जुगलबंदी, सुगम संगीत गायन, संगीत नाटकांमधून भूमिका यातही त्यांनी ठसा उमटवला आहे. गेली ३५ वर्षे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत आणि परदेशात ओमान येथे एकूण तीन हजारांहून अधिक कीर्तने त्यांनी सादर केली आहेत.

पुण्याच्या हभप सौ. स्मिता आजेगावकर ३ ऑगस्टला श्री समर्थ रामदास स्वामी या आख्यानविषयावर कीर्तन करतील. एमए (इंग्रजी) पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण पती हभप प्रभाकरबुवा यांच्याकडे झाले. सासरे हभप तुकारामबुवा परभणीतील नामवंत कीर्तनकार होते. स्मिता आजेगावकर यांनी संगीत नाटकांतून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २५ वर्षांत महाराष्ट्रासह अन्य राज्यांत त्यांनी कीर्तने केली आहेत. प्राचार्य राम शेवाळकर, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आदींनी त्यांच्या कीर्तनकलेची प्रशंसा केली आहे.
कीर्तन सप्ताहातील सांगतेचे पृथ्वीराज चौहान या आख्यान विषयावरचे कीर्तन ४ ऑगस्ट रोजी हभप श्रीनिवास पेंडसे सादर करणार आहेत. धामणी (संगमेश्वर) येथे श्रीनिवास पेंडसे कीर्तनकार आणि प्रवचनकार असून त्यांची अनेक कीर्तने, व्याख्याने ऐतिहासिक विषयांवरची असतात.

कीर्तन सप्ताहाचा आस्वाद सर्व कीर्तनप्रेमी, रसिकांनी घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply