थिबा राजवाड्याच्या परिसरात २१ आणि २२ जानेवारीला रंगणार आर्ट सर्कल संगीत महोत्सव

रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे गेली १५ वर्षं थिबा राजवाड्याच्या परिसरात होणाऱ्या संगीत महोत्सवाच्या या वेळच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ आणि २२ जानेवारी २०२३ असे दोन दिवस हा महोत्सव रंगणार आहे.

शनिवारी, २१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या शास्त्रीय सादरीकरणाने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यांना प्रणव गुरव तबलासाथ, तर अथर्व कुलकर्णी संवादिनीची साथ करणार आहेत. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून एक तपाहून अधिक काळ शिक्षण घेऊन यशस्वी यांची उज्ज्वल वाटचाल सुरू आहे.

त्यानंतर, तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला तालचक्र हा ताल, लय, स्वर, पदन्यास यांच्या अनोख्या संगमाचा कार्यक्रम होणार आहे. तालाच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा हा एक अभिनव कार्यक्रम आहे. विजय घाटे यांचे तबलावादन, ताकाहिरो अराई यांचे संतूर वादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे कथ्थक नृत्य अशी सर्वसमावेशक मेजवानी तालचक्रच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला अभिषेक सिनकर संवादिनीसाथ करणार आहेत.

२२ जानेवारीच्या दिवसाची सुरुवात मेहताब अली नियाझी यांच्या सतारवादनाने होईल. ते प्रसिद्ध अशा भेंडी बाजार घराण्याचे वादक आहेत. पद्मभूषण राजन-साजन मिश्रा यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडेदेखील घेतले आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून सादरीकरणाला सुरुवात करून आतापर्यंत अनेक मानाच्या आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. अनेक मानाच्या पुरस्कारांप्रमाणेच भारत सरकारतर्फे दिली जाणारी स्वरतीर्थ फडके शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. मेहताब यांना तबलासाथ प्रवीण करकरे आणि योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील भिसे करणार आहेत.

थिबा राजवाडा परिसरात होणार्‍या या महोत्सवाचा भव्य समारोप किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार करणार आहेत. भारत सरकारचा मानाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले पं. व्यंकटेश कुमार स्वामी हरिदास रचित भजन गायनासाठी ओळखले जातात. कर्नाटक सरकारमार्फत घेतल्या जाणार्‍या संगीत परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक यामध्ये पंडितजींचे मोलाचे योगदान आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गायनासह शिष्य घडवण्यासाठीही त्यांनी अपार मेहनत घेतली आहे.

पं. अजय जोगळेकर पंडित व्यंकटेश कुमार यांना संवादिनीसाथ करणार आहेत. तुळशीदास बोरकर यांच्या तालमीत तयार झालेल्या जोगळेकर यांनी आजपर्यंत भारतातल्या जवळपास सर्वच नामवंत गायक, वादक आणि नृत्य कलाकारांना साथ केली आहे. बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध वादक भरत कामत याच मैफलीत पं. व्यंकटेश कुमार यांना तबलासाथ करणार आहेत. आजोबांकडून मिळालेल्या संगीत वारश्याची जपणूक करत कामत यांनी आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या महोत्सवांमधून, तसेच अगणित व्यावसायिक रेकॉर्डिंगसाठी साथसंगत केली आहे.

गेली दोन वर्षं महाराष्ट्रातील अनेक मानाचे महोत्सव कोविडच्या कारणाने होऊ शकले नाहीत; मात्र त्याही परिस्थितीत आर्ट सर्कलतर्फे आयोजित केला जाणारा थिबा राजवाडा परिसरात होणारा संगीत महोत्सव मात्र खंड न पडता सुरू राहिला. यात रसिकांनी आणि प्रायोजकांनी अतिशय महत्त्वाचा वाटा उचलला. आता यंदाच्या महोत्सवाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून, संगीत महोत्सव प्रवेशिका कार्ड्स हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ही कार्ड्स आर्ट सर्कल सदस्यांजवळ उपलब्ध आहेत. वर्षभरात आर्ट सर्कलच्या बॅनरखाली होणारे सर्व कार्यक्रम संगीत महोत्सव प्रवेशिका कार्डधारकांना निःशुल्क पाहता येणार आहेत. प्रतिवर्षीप्रमाणेच रसिकांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आर्ट सर्कलने केले आहे.


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply