कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत दिमाखात प्रारंभ
रत्नागिरी : तेराशे वर्षांपासूनचा राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यापासून बोध घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.

येथील कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या बाराव्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३ जानेवारी) सायंकाळी झाले. स्व. प्रमोद महाजन संकुलात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात या दिमाखदार महोत्सवाचा प्रारंभ झाला. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर, रत्नागिरी राजपूत संघाचे डुंगरसिंह राठोड, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी आणि श्री. आफळे बुवा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. ठाकूर आणि श्री. राठोड यांचा सत्कार करण्यात आला. हा कीर्तन महोत्सव येत्या शनिवारपर्यंत (दि. ७ जानेवारी) चालणार आहे.
महोत्सवात निरूपण करताना बुवांनी पूर्वरंगात रघुवंशाचे पूर्वज राजा दिलीप यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्रीरामचंद्राचे वंशज कसे एकवचनी होते, याचे वर्णन बुवांनी केले. उत्तररंगात बुवांनी बाप्पा रावळ यांच्या पराक्रमाचे निरूपण केले. हरित ऋषींचा शिष्य असलेल्या कालभोजला राजयोग प्राप्त झाला आणि त्याच्या असीम कर्तृत्वाने त्याचे नाव बाप्पा रावळ असे झाले, असे त्यांनी सांगितले. त्याला राजेपद मिळण्यापूर्वी इसवी सन ७११ मध्ये यवनांनी भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले. सिंधू नदीपासून सिंधूसागरापर्यंत अमर्याद पसरलेल्या हिंदवी राज्याला तेव्हा सर्वप्रथम धक्का बसला. बगदादच्या खलिफाने दाहीर राजाला पराभूत केले आणि त्याच्या राज्यावर सत्ता प्रस्थापित केली. तेव्हाच्या सैन्यामध्ये हत्तीचा वापर अधिक केला जात असे. सैन्याला इशारा देण्याचे काम प्रमुख हत्तीवरूनच होत असे, हे लक्षात घेऊन अवघ्या सतरा वर्षे वयाच्या मीर कासीमने युक्ती योजली. हत्ती आगीमुळे बिथरतात, हे लक्षात घेऊन त्याने अग्निबाण सोडले. त्यामुळे खुद्द दाहीर राजाचा हत्ती बिथरला. त्यामुळे पराक्रमी दाहीर राजाचा पराभव झाला. त्याचा शिरच्छेद करण्यात आला. या काळात भारताने अभूतपर्व युद्धतंत्र अनुभवले. संपत्तीची लूट करण्याबरोबरच धर्मांतर आणि स्त्रिया- मुलींचे अपहरण, त्यांच्यावर अत्याचाराचे तंत्र मीर कासिमने अवलंबिले. आपण शत्रूच्या सैन्याच्या ताब्यात जायचे नाही, हे ठरवून दाहिराच्या पत्नीने जय हर अशी गर्जना करत मृत्यूला कवटाळले. याच जय हर शब्दप्रयोगाचे पुढे जोहार असे नामांतर झाले. या याच पराभवाचा बदला बाप्पा रावळ यांनी घेतला आणि शत्रूला गझनीच्या दारापर्यंत पोहोचविले. सिंधू नदीपासून बगदादपर्यंत ठिकठिकाणी आपल्या चौक्या त्याने लावल्या. सध्याच्या पाकिस्तानात असलेले रावळपिंडी शहर याच बाप्पा रावळच्या स्मृती जपत आहे. बाप्पा रावळने निर्माण केलेली दहशत ३०० वर्षे टिकून राहिली. त्यानंतर १००१ साली बगदादच्या खलिफाने पुन्हा एकदा भारतावर आक्रमण केले. सोमनाथ येथील प्रसिद्ध मंदिर फोडले. हे वैभवशाली मंदिर पुढे अनेक वेळा फोडले गेले. बेछूट कत्तल, धर्मांतर आणि स्त्रियांचे अपहरण हे यवनांचे युद्धतंत्र होते. या तंत्रावर उपाय शोधण्याचे काम भारतात झाले नाही, अशी खंत बुवांनी व्यक्त केली. नंतर झालेल्या युद्धामध्ये यवनांचा पराभव केल्यानंतर त्यांनी धर्मांतरित केलेल्या मूळ हिंदूंना पुन्हा आपल्या धर्मात घेतले गेले असते, तर पुढच्या काळात वेगळा इतिहास घडला असता. बाप्पा रावळने गझनीच्या मुलीशीच विवाह करून त्याच्याशी नातेसंबंधही जोडले. हा आदर्श पुढच्या काळात पाळला गेला नाही. धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात घेतले गेले नाही. त्यामुळे चिडून गेलेल्या बायकांची संतती पुढे घोरी जमात म्हणून ओळखली जाऊ लागली. हिंदू धर्माने धिक्कारलेल्या या समाजाने हिंदूंवर सूड उगवायचे ठरविले आणि ते कट्टरपणे उभे राहिले. त्यातूनच जन्मलेल्या महंमद घोरीने भारतावर सातत्याने आक्रमण केले. कनोजच्या जयचंद राजाने तर याच महंमद घोरीला निमंत्रण दिले आणि त्याच्या मनाविरुद्ध पृथ्वीराज चव्हाणाशी विवाह करणाऱ्या आपल्या कन्येविरुद्धच जणू सूड उगविला. महंमद घोरीने पृथ्वीराज चव्हाणला पराभूत केले. त्याचे हाल हाल केले. डोळे काढले. मात्र अंध झालेल्या शब्दवेधी पृथ्वीराज चव्हाणाने केवळ आवाजाच्या दिशेने बाण सोडून महंमद घोरीला ठार मारले. हा आपला इतिहास अभ्यास करण्यासारखा आहे, असे बुवांनी सांगितले.
बुवांना हेरंब जोगळेकर (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांनी संगीतसाथ केली.
नरेंद्र मोदी द्रष्टा राज्यकर्ता
युद्धशास्त्राचा अभ्यास करून शेजारी आणि शत्रूची ताकद, तयारी यांचा अभ्यास करणारे मोजके राज्यकर्ते भारताला लाभले. त्यापैकी नरेंद्र मोदी हे एक आहेत. चीनने भारताच्या सीमेपर्यंत रस्ता तयार केल्याचे लक्षात घेऊन त्या दुर्गम प्रदेशात उतरण्यासाठी थेट विमानतळ उभारून त्यांनी आपल्या युद्धशास्त्रीय द्रष्टेपणाची चमक दाखवून दिली, असे आफळे बुवा म्हणाले.






(छायाचित्र सौजन्य : पराग हेळेकर, तन्मय दाते)

