रत्नागिरी : गेली १५ वर्षे रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या परिसरात आर्ट सर्कलतर्फे आयोजित केला जाणारा शास्त्रीय संगीत महोत्सव उद्या आणि परवा (२१-२२ जानेवारी २०२३) होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने होणार आहे. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून गेली १२ वर्षे त्या गायनाचे धडे घेत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. ‘एनसीपीए’ची केसरबाई केरकर शिष्यवृत्तीच्याही त्या मानकरी आहेत. त्याचप्रमाणे पैंगणकर पुरस्कार, छात्र गंधर्व पुरस्कार, आदित्य बिर्ला फाउंडेशनचा कला किरण पुरस्कार, पुलोत्सव सन्मान अशा पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे.
या मैफलीसाठी त्यांना प्रणव गुरव तबलासाथ, तर अथर्व कुलकर्णी संवादिनीसाथ करणार आहेत. प्रणव गुरव हे फारुखाबाद घराण्याचे तबलावादक डॉ. अनीश प्रधान यांचे शिष्य. बालपणी नाना मुळ्ये आणि नंतर सुरेश सामंत यांच्याकडे त्यांनी प्राथमिक धडे गिरवले आहेत. भारती विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते सध्या डॉक्टरेटची तयारी करत आहेत. संवादिनीवादक अथर्व कुलकर्णी हे सुप्रसिद्ध वादक तन्मय देवचक्के यांचे शिष्य. भारती विद्यापीठातून संवादिनी विषयात एमए ही पदवी त्यांनी मिळवली आहे. उत्कृष्ट संवादिनीवादनासाठी त्यांना ‘सीसीआरटी’ची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यशस्वी यांना त्यांच्या सादरीकरणासाठी अशा दोन कसलेल्या तरुण वादकांची समर्थ साथ लाभणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप गायन-वादन-नृत्य या कलांच्या संगमाने होणार आहे. पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तालचक्र हा कार्यक्रम महोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहे. विजय घाटे यांचा तबला, ताकाहिरो आराई यांची संतूर, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे नृत्य आणि अभिषेक सिनकर यांची संवादिनी यांच्या एकत्रित परिणामाने तालचक्र कार्यक्रम रसिकांना गुंतवून ठेवतो. प्रत्येक मैफलीचा तोल सांभाळण्याचे काम ताल करतो. अशा या तालांच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा तालचक्र हा एक अनोखा कार्यक्रम आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवसाची म्हणजे २२ जानेवारीची सुरुवात सुप्रसिद्ध सतारवादक मेहताब अली नियाझी करणार आहेत. मेहताब हे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे पुत्र. वडिलांच्या तालमीत वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मेहताब यांनी सतारीशी दोस्ती केली. त्यांचे आजोबा उस्ताद वझीर अली काद्री हे सुप्रसिद्ध संवादिनीवादक. त्यांच्याकडून मेहताब यांनी भेंडीबाजार घराण्याची गायकीदेखील शिकून घेतली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी जाहीर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. आज ते भेंडी बाजार घराण्याचे अत्यंत आश्वासक वादक म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वदेखील केले आहे.
मेहताब यांना सतारवादनासाठी स्वप्नील भिसे यांची तबलासाथ लाभणार आहे. स्वप्नील यांनी प्रारंभिक प्रशिक्षण चंद्रकांत बोरसेकर यांच्याकडून घेतले. त्यानंतर प्रवीण करकरे आणि सध्या योगेश समसी यांच्याकडे पुढील धडे गिरवत आहेत. आजवर अनेक महान कलाकारांना त्यांनी तबलासाथ केली आहे. पं. डी. व्ही पलुस्कर पुरस्कार, पं. नंदन मेहता पुरस्कार, पं. कांथे महाराज पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांप्रमाणेच भारत सरकारतर्फे दिली जाणारी स्वरतीर्थ सुधीर फडके शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली आहे.
२२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता या महोत्सवाचा समारोप किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल. वयाच्या १५व्या वर्षी गदगचे वीरशैव संत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय कलाकार पुट्टराज गवई यांच्या वीरेश्वर पुण्याश्रमामध्ये ते दाखल झाले. तिथून पुढे १२ वर्षे आश्रमात राहून त्यांनी गायन तपश्चर्या केली. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली. त्यांचे गुरू कर्नाटक शास्त्रीय संगीतातदेखील प्रवीण असल्याने स्वाभाविकपणे पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनातदेखील कर्नाटक संगीताची झाक दिसून येते. आश्रमातून बाहेर पडल्यावर जवळजवळ १५ वर्षांनी पं. भीमसेन जोशी यांनी त्यांना सवाई गंधर्व महोत्सवात गाण्यासाठी निमंत्रित केले. संगीत विषयावर त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा समावेश कर्नाटक शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
पंडितजींना संवादिनीसाथ पं. अजय जोगळेकर, तर तबलासाथ भरत कामत करणार आहेत. मूळचे रत्नागिरीचे असलेले जोगळेकर संगीत महोत्सवाशी बंधुत्वाच्या नात्याने जोडले गेले आहेत. ज्येष्ठ गुरू संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून मिळालेल्या विद्या आणि स्नेह या भांडवलावर आजपर्यंत पं. जोगळेकर यांची कारकीर्द बहरती राहिली आहे.
पं. कुमार यांना तबलासाथ करणार आहेत, बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक भरत कामत. वडिल पंडित चंद्रकांत कामत आणि आजोबा पं. शांताराम कामत यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत. विविध महोत्सवांतून त्यांनी आजवर अनेक दिग्गजांना तबलासाथ केली आहे. देशभरातील प्रतिष्ठेच्या संगीत समारंभांमध्ये त्यांनी तबलावादक म्हणून जबाबदारी निभावली आहे.
रत्नागिरी शहराची शान असलेला थिबा राजवाडा या महोत्सवाच्या निमित्ताने सजवला जातो. रंगकाम, प्रकाशयोजना, संपूर्ण आवारात रांगोळी अशी सजावट राजवाड्याच्या वैभवशाली देखणेपणात भर घालते. आनंदाची बेगमी करून देणार्या या शास्त्रीय संगीत महोत्सवाला सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आर्ट सर्कलने केले आहे.













