दापोली : निःस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले, अनेक मोठ्या पदांवर काम केलेले भिकू रामजी इदाते (दादा) यांना नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
आझाद मैदानातून सुरू झालेली ही सायकल फेरी रूपनगर- ऐश्वर्यनगर- श्रीगुरूनगर- लष्करवाडी जालगाव – गणेशनगर – आनंदनगर – उदयनगर – आझाद मैदान अशा सहा किलोमीटर मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटांतील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. यादरम्यान सहभागी नागरिकांनी जालगावात आनंदनगरमध्ये दादांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात आले. दादांनी बालपणीचे आणि शालेय जीवनातले अनुभवही सांगितले. हसतखेळत अनेक विषयांवर गप्पा झाल्या.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात आमोद बुटाला, केतन पालवणकर, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, प्रशांत पालवणकर, श्रीराम इदाते आदींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्यराबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

