
तळवडे (ता. राजापूर) : महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय समाज बदलणार नाही. पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, आधुनिक सावित्रीने शिक्षणाची दारे खुली केली. कोकणातील बंद दारांची समस्या सोडवण्याची शक्ती स्त्रियांच्या हाती आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी व्यक्त केले.
तळवडे (ता. राजापूर) येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या गुरुवर्य स्वा. महादेव कुंडेकर साहित्य नगरीतीली व्यासपीठावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कामधंद्यानिमित्त मूळ गाव सोडून महानगरांमध्ये जाण्याची कोकणवासीयांची प्रथा अनेक वर्षे असली तरी गेली काही वर्षे शहरात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबांचा आकार लहान झाला आहे आणि गावी राहण्यास माणसेच उरली नाहीत. यामुळे गावोगावी कित्येक घरे अनेक महिने बंद आहेत. ही परिस्थिती बदलून कोकणातील गावे पुन्हा पूर्वीसारखी हसरी-खेळती करावी, यासाठी लोकजागृती करण्याच्या हेतूने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सौ. कळंबटे यांनी केले.
मूळच्या तळवडे येथील पूर्वाश्रमीच्या ज्योती शिगम आणि आताच्या श्रद्धा कळंबटे यांचा नेहा लाड संघाच्या वतीने यांनी सन्मान केला. आपला विषय मांडताना त्या श्रोत्यांना तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या कोकणात घेऊन गेल्या. त्या काळाचे वर्णन करताना त्या म्हणाल्या, शहरीकरणामुळे मुलांना खेळायला मैदाने, मोकळ्या जागा मिळत नाहीत. लहानपणीचा शेणामुताचा, आंब्याचा गंध आज आठवूनही अंगावर शहारे येतात. कितीही भौतिक सोयी झाल्या तरी पूर्वीची मातीची मडकी जी चव देतात ती मिळत नाही. कुठेही जाताना बांधावरून चालावे लागे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून कोसळणारे धबधबे पाहायला मिळत. तो काळ पुन्हा आणून कोकणी संस्कृती आणि गावांचे चैतन्य टिकवून ठेवण्याचे आव्हान पेलण्यात महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्या म्हणाल्या.
आज सिमेंटची जंगले गावाकडे सरकायला लागली आहेत. नवनवीन शोध, नवे तंत्रज्ञान यांचा परिणाम निसर्गावर झाला. शेती ओस पडू लागली, माणसे शहराकडे धाव घेऊ लागली. बंद घरांच्या समस्येचे मूळ इथे आहे, अशी मांडणी सौ. कळंबटे यांनी केली.
सौ. कळंबटे यांनी मुलीच्या जन्माकडे पाहण्याच्या दृष्टीने सकारात्मक बनण्याची गरज स्पष्ट केली. आजही मुलगी झाली तर मुलाच्या जन्माएवढा आनंद होतो का, असा प्रश्न विचारून तरुणांनी हा विचार स्वीकारलाय, सकारात्मक बदल दिसू लागलेत, असे आशादायक निरीक्षण त्यांनी नोंदविले. प्रलोभने न दाखवता मानसिकता बदलायची आहे. ‘स्वयंसेतू’ ही संस्था मुलीचा जन्म झाला की शुभेच्छा कार्ड पाठवते. जे मी करू शकत नाही, त्याची शिक्षा मला का, असा प्रश्न विचारून मुली होतात म्हणून तुमच्या मुलाचे दुसरे लग्न लावण्यापेक्षा माझे दुसरे लग्न लावून द्या, कदाचित फरक पडेल, असे बोलण्याची हिंमत मुलींनी दाखवण्याची वेळ आली आहे.
आपल्याकडे कुमारी मातांचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. घटस्फोटाचे अर्ज पूर्वी दहा-वीस असत, आता महिन्याला शेकडो येऊ लागले आहेत. शिक्षणामुळे एक प्रकारचा अहंकार येऊ लागला आहे. संसार करायचा नाही, असे म्हणत घटस्फोट मागणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. संसार मोडण्यासाठी दोन्हीकडचे आईवडील जवळजवळ सत्तर टक्के जबाबदार असतात. यात बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे सौ. कळंबटे म्हणाल्या.
आणखी एका सत्रात ‘मराठी नाटकाची ७५ वर्षे’ या विषयावरील प्रा. डॉ. राहुल मराठे यांच्या व्याख्यानात नाटकाशी निष्ठा असणारे प्रेक्षक आणि कलाकार तयार करायला पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

