ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद : अरुण इंगवले

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून मला माझी ताकद वाटते, असे प्रतिपादन चिपळूण येथील कवी अरुण इंगवले यांनी केले.

तळवडे (ता. राजापूर) येथील आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात श्री. इंगवले यांची धीरज वाटेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. ती खूपच रंगली. त्यावेळी ते बोलत होते.

अरुण इंगवले वाणिज्य शाखेचे पदवीधर, परंतु मराठी भाषा आणि साहित्याचे जाणकार अभ्यासक आणि रसिक आस्वादक अशी त्यांची आता ओळख आहे. त्यांची मुलाखत घेणारे धीरज वाटेकर संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटन आणि पर्यावरणविषयक लेखक म्हणून प्रसिद्ध असले तरी तेही अभियांत्रिकीचे पदविकाधारक आहेत. अशा दोन्ही भिन्नक्षेत्रीय व्यक्तींच्या कवितेसंबंधीच्या वार्तालापाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ग्रामीण भागात जन्मलेले आणि ग्रामीण भागातच माध्यमिक शिक्षण घेतलेले अरुण इंगवले यांना शहरात आल्यानंतरचे अनुभव कसे आले, या प्रश्नाने मुलाखत सुरू झाली. त्यांनी दिलेल्या एकेका उत्तरातून पुढचा प्रश्न उमलत गेला आणि त्या संवादातून कविराज अरुण इंगवले यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आगळ्या वेगळ्या पैलूंची उपस्थितांना ओळख झाली.

श्री. इंगवले यांनी ग्रामीण भागातून येणे ही दुर्बलता नसून ताकद असल्याची कल्पना मांडली. ते म्हणाले, दोनच महिने मी पहिलीच्या वर्गात बसलो, नंतर दुसरीत. प्रत्येक समारंभात भाषण वगैरेमध्ये पुढे असे. कॉलेजमध्ये आल्यावर काहीसा न्यूनगंड, पण ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव असल्याची ताकद लक्षात आली. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून कादंबरी वगैरे पुस्तके वाचण्याकडे कल जास्त होता. ग्रंथपालांनी नकार दिला म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचा सभासद बनलो. छंदोबद्ध आणि छंदमुक्त कविता याबद्दल मत काय, असे विचारता ते म्हणाले, पहिल्या संग्रहातील कविता छंदोबद्ध, ‘आबूट घेऱ्यात’मध्ये मुक्त छंदात कविता लिहिल्या. मला छंदोबद्ध प्रकार आवडतो, पण आशयाच्या, अभिव्यक्तीच्या मागणीप्रमाणे कविता लिहिली जाते.

एखादी आवडती कविता कोणती, या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ‘पावसाची बायको’ या कवितेची निवड केली. ते म्हणाले, रसिकांसाठी सादरीकरणाची वेगळी आणि पुस्तकातून आस्वाद घेण्याची वेगळी. असेल नसेल ते गोळा करून छापणे म्हणजे कवितासंग्रह नव्हे. ‘पावसाची बायको’ कविता सांगलीच्या काही भागातील दुष्काळी परिस्थितीवरून सुचली. पावसाला बायको असती तर त्याच्या बेभरवशीपणाबद्दल ‘कडमडत असतील कोकणात, तिथं नसतील तर सापडतील चेरापुंजीत’ असे म्हणाली असती, अशी कल्पना यात मांडली आहे.

अनुकरण ते स्वतंत्र शैली या प्रवासाबद्दल ते म्हणाले, कवितेमध्ये अल्पाक्षर रमणीयता पाहिजे, एकही वावगा शब्द कवितेला चालत नाही. कालसुसंगतता हवी, कालबाह्य विषयावर लिहिलेली कविता त्याच क्षणी मेलेली असते.

आजच्या साहित्य चळवळीविषयी बोलताना ते म्हणाले, आपण आत्मकेंद्रित होत चाललोय. स्वतःइतकेच दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा साहित्य जन्माला येते. मोठ्या संमेलनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लहानलहान साहित्य संमेलने घेतली, तर सत्तावीस हजार खेड्यांमध्ये केवढीतरी क्रांती करता येईल.

वातावरण नाही पण बीज अंकुरायची इच्छा आहे अशा तरुणाईला काय सांगाल, असे विचारता श्री. इंगवले म्हणाले, आपण लिहू शकतो ते कोणाला तरी चांगले वाटते, असे दिसले तर प्रेरणा मिळते. लिहिले म्हणजे लगेच छापले गेले पाहिजे, असे नाही. व्यापक विचार पाहिजे. हे छापण्यासाठी दोन झाडांचा बळी देण्याची खरेच गरज आहे का? असा पर्यावरणसुलभ प्रश्न त्यांनी उभा केला.

माणूस म्हणून साहित्यिक कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, यावर बोलताना एका प्रसंगातील मुलीची धीराची आणि साहसी वागणुकीची आठवण जागवून अरुण इंगवले म्हणाले की माझ्या मुली मुलापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत.

कुठल्याही विषयावर तुम्ही एक वेगळा विचार देता. महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांचे भवितव्य या विषयावरील परिसंवादात कोकणाचे प्रतिनिधित्व तुम्ही केले. स्वतःच्या विचारधारेबद्दल काय सांगाल, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, साहित्यिक, विचारवंत यांनी कुठल्याही विचाराला बांधून घेऊ नये. मध्यम मार्ग कोणता यावर चिंतन व्हायला हवे. मी लिहिले म्हणजे लगेच क्रांती होईल या मताचा मी नाही. बदलाची गती लक्षात न येण्यासारखी, कासवासारखी असते. आपण लिहीत राहिले पाहिजे.

ग्रामीण संमेलन घेण्याच्या कामामुळे वाङ्मयीन इतिहासात नक्कीच तुमच्या नावाची नोंद होईल, अशा शब्दांत राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply