महावितरणच्या लाइनमनचे काम कौतुकास्पद : अधीक्षक अभियंता

रत्नागिरी : महावितरणच्या लाइनमनची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी काढले.

केंद्र शासनाने विद्युत क्षेत्रातील लाइनमनच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्च रोजी लाइनमन दिवसाचे आयोजन देशपातळीवर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कोकण परिमंडळ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लाइनमनच्या कार्याचे कौतुक, सुरक्षेबद्दल जागृती, कार्यक्षमतांचा विकास या हेतूने कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.

श्री. पळसुलेदेसाई पुढे म्हणाले की, वीजपुरवठा सुरळित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वीज कर्मचारी, लाइनमन म्हणजे महावितरणचा कणा आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीत दुर्गम, दऱ्याखोऱ्यांत विस्तारलेल्या विद्युत जाळ्यात आपले दैनंदिन काम करणे आव्हानात्मक आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात वीज कर्मचाऱ्यांनी वादळ, पाऊस कशाचीही तमा न बाळगता वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन कोलमडलेली वीज यंत्रणा युद्ध पातळीवर उभी केली. लाइनमननी सुरक्षितपणे आपले कामकाज पार पाडावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी लाइनमनची समयोचित मनोगते झाली. महावितरणच्या कोकण परिमंडळ कार्यालयासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयस्तरावर लाइनमन कर्मचाऱ्यांचे कौतुकाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.

परिमंडळातील कार्यक्रमास अध्यक्षस्थानी सहाय्यक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते. कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपव्यवस्थापक (मानव संसाधन) संजय वैशंपायन यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply