रत्नागिरीतील शास्त्रज्ञाचे हिंदी पुस्तक करणार देशभरातील मत्स्य उत्पादकांना मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी आतापर्यंत असंख्य मत्स्योत्पादकांना मार्गदर्शन केले असून, त्यासाठी पुस्तकेही लिहिली आहेत. आता त्यांनी ‘मीठे जल में मछलीपालन’ हे समग्र माहिती देणारे हिंदी पुस्तक लिहिले असून, त्याचा उपयोग देशभरातील मत्स्योत्पादकांना होणार आहे. नुकतेच एका ऑनलाइन समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या क्षेत्रात देशभर कार्यरत असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, तसेच शेतकऱ्यांनी या पुस्तकाचे स्वागत केले असून, हिंदी भाषेत या विषयावरच्या पुस्तकाची असलेली मोठी उणीव डॉ. जोशी यांच्या या पुस्तकामुळे भरून निघेल, अशी भावना व्यक्त केली आहे.

मत्स्यशेती या विषयाची व्याप्ती अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यशेती गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड इत्यादी उत्तरेच्या राज्यात सुरू झाली आहे. तथापि, हिंदी भाषेत मत्स्यशेतीविषयी योग्य आणि खात्रीशीर माहिती मत्स्योत्पादकांना उपलब्ध होत नव्हती. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने डॉ. विजय जोशी यांनी ‘मीठे जल में मछलीपालन – संपूर्ण मार्गदर्शिका’ हे पुस्तक लिहिले असून, मुंबईच्या नवचैतन्य प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमात डॉ. जोशी यांचे कुटुंबीय आणि स्नेही व मित्रमंडळी ऑफलाइन उपस्थित होती, तर देशभरातील या क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी आणि मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते. डॉ. त्रिवेदी (डायरेक्टर ऑफ फिशरीज, उत्तराखंड), प्रमोदकुमार शुक्ला (डेप्युटी डायरेक्टर ऑफ फिशरीज, उत्तराखंड), अभय देशपांडे (डेप्युटी डायरेक्टर ऑफ फिशरीज, महाराष्ट्र), मिथिलेशकुमार पाठक (माजी डीजीएम, नाबार्ड) आदी मान्यवरांचा त्यात समावेश होता.

‘नाबार्ड उत्तराखंड’चे चीफ जनरल मॅनेजर विनोद बिष्ट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, ‘हे पुस्तक अत्यंत साध्या भाषेत लिहिलेले आहे. मत्स्य शेतकऱ्याला पडणाऱ्या सर्व शंकांचं यातून निरसन होते. मत्स्यशेतीविषयक समग्र माहिती एकत्रित देणारे असे पुस्तक आतापर्यंत हिंदी भाषेत उपलब्ध नव्हते. ती उणीव आता भरून निघाली आहे. या पुस्तकाचा उपयोग केवळ मत्स्य शेतकरीच नाही, तर मत्स्यविषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी, अधिकारी, बँक अधिकारी या सर्वांना होईल. विशेषतः उत्तर भारतामध्ये मत्स्य शेतकऱ्यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरू शकते.’

कार्यक्रमाचे अध्यक्षपद ग्रोवेल इंटरनॅशनल फीड कंपनीचे उपाध्यक्ष संदीप अहिरराव यांनी भूषविले. डॉ. जोशी हे आपले गुरू असल्याचे नमूद करून अहिरराव म्हणाले, ‘प्रत्येक माशाबद्दल स्वतंत्रपणे दिलेली माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक माशाची वाढण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, तलावाचा प्रकार या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या इतर कोणत्याही पुस्तकात सांगितलेल्या नाहीत. डॉ. जोशी यांच्या पुस्तकात त्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळेच विशिष्ट प्रकारच्या माशांची शेती करताना हे पुस्तक मत्स्य शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.’

या कार्यक्रमाला रत्नागिरीत उपस्थित असलेले साताऱ्याचे सुप्रसिद्ध उद्योजक किरण जोशी म्हणाले, ‘हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीचे बायबल आहे.’ ‘सकाळ’च्या ‘सिल्क’चे प्रमुख अमोल बिरारी ऑनलाइन बोलताना म्हणाले, ‘डॉ. जोशी अनेक वर्षं ‘सकाळ’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित असतात. मत्स्य क्षेत्रातील त्यांचा ४० वर्षांचा गाढा अनुभव लक्षात घेता, हे पुस्तक शेतकऱ्याला सोप्या भाषेत सखोल माहिती देणारे असे झाले आहे. आतापर्यंत हिंदीमध्ये अशा प्रकारचे पुस्तक नव्हते. आता महाराष्ट्राबाहेरच्या मत्स्य शेतकऱ्यांना ते अतिशय उपयोगी ठरेल.’

श्री. पाठक यांनी सांगितले, ‘हे पुस्तक बँक अधिकाऱ्यांनाही प्रोजेक्ट अ‍ॅप्रायझल करताना अतिशय उपयुक्त ठरेल. बँक अधिकारी, मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक आपल्याकडे आवश्यक बाळगले पाहिजे. संपूर्ण भारतभर हे पुस्तक लोकप्रिय होईल, असा विश्वास मला वाटतो.’

रत्नागिरीत उपस्थित असलेले शिरगावच्या मत्स्यअभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांनी हे पुस्तक खरेदी करून विद्यार्थ्यांना ते वाचण्यासाठी प्रेरित करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव श्रीकृष्ण साबणेही रत्नागिरीत कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी डॉ. जोशी यांना पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. पुस्तकाचे प्रकाशक मराठे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

लेखक डॉ. विजय जोशी यांनी या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली. मत्स्यशेतीविषयी आवश्यक ती समग्र माहिती या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत दिलेली आहे. पुस्तकात अनेक अनुरूप चित्रे आहेत, ज्याद्वारे मत्स्य शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. महाराष्ट्राच्या बाहेरच्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील मत्स्य शेतकऱ्यांनीसुद्धा हे पुस्तक विकत घेऊन वाचावे आणि त्याचा अभ्यास करून यशस्वीपणे मत्स्यशेती करावी, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले.

‘हे पुस्तक म्हणजे डॉ. विजय जोशी यांच्या मत्स्यशेतीतील आणि मत्स्यशिक्षण क्षेत्रातील ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचे सार आहे,’ अशी भावना डॉ. जोशी यांचे पुत्र डॉ. प्रथमेश जोशी यांनी संभाजीनगरहून बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभारप्रदर्शन डॉ. जोशी यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गोडसे यांनी केले.

या पुस्तकाची किंमत ४२५ रुपये असून, 9423291434 या क्रमांकावर संपर्क साधून पुस्तक मागवता येईल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply