भरपूर साहित्यमूल्य आणि लेखनाची मुळे रुजलेल्या कोकणाला साहित्य विश्वात मिळणारी उपेक्षेची वागणूक लक्षात घेऊन कोकणातील साहित्याला ऊर्जिताअवस्था प्राप्त व्हावी, नवनवे साहित्यिक निर्माण व्हावेत, साहित्यिकांना उत्तम व्यासपीठ मिळावे, अशा विविध कारणांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. रत्नागिरीत १९९० साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोकणाचे साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी संमेलनानंतर लगेचच या स्वतंत्र साहित्यिक चळवळीचा पाया रचला. या चळवळीने पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यापासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण भागात आपले स्थान निर्माण केले. पाया रचला आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांचे स्मारक त्यांच्या मालगुंड या जन्मगावी उभारण्यापर्यंतचा कळस चढवला. कोणाही मराठी साहित्यिकाचे असे स्मारक त्यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे साहजिकच असे कार्य करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेकडे पाहण्याचा उर्वरित साहित्य विश्वाचा दृष्टिकोन बदलला. कोकणातील साहित्यिक चळवळ वाढीला लागली.
कोमसापतर्फे दरवर्षी सर्व रसिकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, बालकुमारांसाठी अशी विविध साहित्य संमेलने घेतली जाऊ लागली. मोठमोठे साहित्यिक चळवळीशी जोडले गेले. कोकणातल्या अनेक साहित्यिकांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या प्रतिभेला चालना देणारे पुरस्कार नव्या साहित्याच्या निर्मितीसाठी प्रेरणादायक ठरले. पण एका ठरावीक कालावधीनंतर कोकणातल्या या साहित्य चळवळीला उतरती कळा लागली. आता केवळ उपचारापुरते वेगवेगळे कार्यक्रम पार पाडले जातात. पण त्यामध्ये उत्साहाचा आणि संमेलनांमध्ये रसिकांचा अभावच जाणवतो. मोजके अपवाद वगळता कोमसापच्या अनेक शाखा जेमतेम तग धरून आहेत. याच्या विविध कारणांचा शोध घ्यावा लागेल. कोमसापच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची अलीकडे झालेली निवड हे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणून पाहावे लागेल.
अनेक वर्षे रिक्त राहिलेले जिल्ह्याचे अध्यक्षपद आनंद शेलार यांना मिळाले. पेशाने शिक्षक असलेले श्री. शेलार गेली काही वर्षे तालुका शाखेसाठी कार्यरत आहेत. मोठ्या उत्साहाने ते विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत असतात. पण त्यांची जिल्हाध्यक्षपदाची निवड कोणत्या निकषावर झाली, हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे. जिल्हाध्यक्ष निवडीची सभा मालगुंड येथे झाली. त्यामध्ये अनेक मुद्दे मांडले गेले. निवडणुकीसाठी जिल्ह्यातीलच निरीक्षक नेमण्याचा मुद्दा पुढे आला. निरीक्षक परजिल्ह्यातील असावा, असा शिरस्ता असताना याच जिल्ह्यातील निरीक्षकाची नेमणूक कशी केली, असा प्रश्न उपस्थित झाला. तो विचारात न घेता सभेचे कामकाज पुढे चालू राहिले. रत्नागिरी शाखेकडून आनंद शेलार आणि खेड शाखेकडून विमलकुमार जैन यांनी अध्यक्षपदासाठी उत्सुकता दाखविली. निवडणूक टाळण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी आपसात चर्चा करून नाव निश्चित करावे, असे सुचवण्यात आले. मात्र दोन्ही उमेदवार आपल्या मतापासून हटले नाहीत. एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे दोन्ही नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली. जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत श्री. शेलार यांना लांजा, रत्नागिरी आणि मालगुंड या ३ शाखांनी, तर श्री. जैन यांना देवरूख, गुहागर, चिपळूण, खेड आणि दापोली या ५ शाखांनी पसंती दर्शवली होती. त्यामुळे श्री. जैन यांची निवड होण्याची शक्यता होती. पण प्रत्यक्षात श्री. शेलार यांच्या अध्यक्षपदाची एकतर्फी घोषणा करण्यात आली. साहजिकच या निवडप्रक्रियेवर श्री. जैन यांना पाठिंबा देणाऱ्या शाखा नाराज झाल्या. ही आणि अशा तऱ्हेची विविध कारणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मुळातच उतरती कळा लागलेल्या या साहित्यिक चळवळीला अत्यंत हानिकारक आहे. आधीच कोमसापपासून अनेक जण फारकत घेऊ लागले आहेत. ती प्रक्रिया आणखी वेगाने होईल आणि कोमसाप म्हणजे एक नावापुरती साहित्यिक संस्था ठरेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ जुलै २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया -२१ जुलै २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia21july येथे क्लिक करा.
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : ‘कोमसाप’मधील अस्वस्थता
https://kokanmedia.in/2023/07/12/skmeditorial21july/
मुखपृष्ठकथा : सुविधांच्या अभावावर मात करणारा कोकणातील पहिला आयर्नमॅन : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी अलीकडेच कझाकस्तान येथे झालेली फुल आयर्नमॅन ही खडतर स्पर्धा पार करून कोकणाचा पहिला आयर्नमॅन बनण्याचा मान मिळविला. त्यामध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी त्यांनी दिलेली झुंज जितकी महत्त्वाची, तितकीच कोकणातील क्रीडासुविधांच्या अभावावर त्यांनी केलेली मातही महत्त्वाची आहे. त्यांच्याविषयी प्रमोद कोनकर यांचा विस्तृत लेख…
रत्नागिरीच्या महिला बचत गटांचा आवाज जी-२० परिषदेत
याव्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


अतिशय योग्य विवेचन
कोमसापच अस्तित्व आता कुठे जाणवतच नाही.