आधी चांगला माणूस बना : धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आधी चांगला माणूस बना. नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. योग, प्राणायाम करून मनावर ताबा ठेवा आणि विनयशील राहा. यश मिळाले तरी हुरळून जाऊ नका. पुढे काय करायचे हे विसरू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेश सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीतर्फे आज झालेल्या संवादमाला कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, बुद्धिमत्ता व भावना यांचा ताळमेळ घालता आला पाहिजे. कोकणातील मुले धाडस करत नाहीत का? त्यासाठी मेहनतीची गरज आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रवास करताना ध्येयापासून दूर राहू नका. तुमच्या या वयात नकळत मन विचलित होते. ते होऊ देऊ नका. मनावर ताबा हवा. नैराश्य भावना मनात आल्या, तरी त्या जास्त वेळ टिकत नाहीत. स्पर्धा परीक्षा देताना प्लॅन ए व प्लॅन बी हासुद्धा तयार ठेवा.

याप्रसंगी सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी पोलीस अधीक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिल्पाताईंनी भाषणात सांगितले की, व्यक्तिमत्त्व विकास आणि धाडसी वृत्तीसाठी आत्मचिंतन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कोणताही निर्णय भावनेने नाही तर बुद्धीने घ्यावा.

व्यासपीठावर अॅकॅडमीचे अध्यक्ष भरत ओसवाल, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन नूतन परांजपे यांनी केले. अॅकॅडमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर-मोरे यांनी आभार मानले.

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अॅकॅडमीत मार्गदर्शन घेऊन शासकीय नोकरीमध्ये नोकरी मिळवलेल्या प्रज्ञा नार्वेकर, श्रद्धा दैत, शांभवी पाटील यांचा सत्कार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply