रत्नागिरी : देशातील अनेक राज्यांतून अगदी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून उद्योग उभारणीसाठी महिला, तरुण-तरुणी भेटत असतात, मात्र कोकणातील दोन्ही जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरीत आजपासून दोन दिवसांसाठी आयोजित केलेल्या रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. येथील जलतरण तलावाशेजारी हा महोत्सव भरविण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, एमएसएमईचे मंत्रिपद आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक उद्योजक, तरुण दिल्लीमध्ये भेटण्यासाठी आले. परंतु कोकणातील दोन जिल्ह्यांमधील एकही उद्योजक किंवा तरुण उद्योग सुरू करण्यासाठी भेटायला आला नाही. कोकणामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, त्यासाठी कोकणी माणसाने आपल्या वृत्तीमध्ये बदल करायला हवा. रत्नागिरीमध्ये क्लस्टर प्रपोजल करा, आवश्यक ते सर्व सहकार्य आपण देण्यास तयार आहोत. रत्नागिरीसाठी ट्रेनिंग सेंटर देतो, त्याचा फायदा नवीन उद्योग निर्माण होण्यासाठी होईल. मात्र हे ट्रेनिंग सेंटर व्हावे यासाठीही कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. हा महोत्सव कोणत्याही राजकीय पक्षासाठी, जातीसाठी नसून रत्नागिरीकरांसाठी आहे. एमएसएमईच्या माध्यमातून नागरिकांची प्रगती व्हावी एवढीच भावना आहे. रत्नागिरीकरांचे दरडोई उत्पन्न एक लाख चौर्याऐंशी हजार रुपये, सिंधुदुर्गचेही त्याहून अधिक आहे. गोव्याचे सव्वाचार लाखाहून अधिक असून, गोव्यासारखेच निसर्ग सौंदर्य, नैसर्गिक साधनसंपत्ती रत्नागिरीत आहे. परंतु एवढे असूनही उत्पन्न वाढलेले नाही. माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत जवळपास सात कोटी उद्योग असून सुमारे सोळा कोटी कामगार आहेत. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात या मंत्रालयाचा ३० टक्के वाटा आहे. निर्यात जवळपास ४९ टक्के आहे. एवढे उद्योग असूनही रत्नागिरी त्यातील फक्त ६२ हजार उद्योग असून ही संख्या एक लाखावरही नाही.
श्री. राणे म्हणाले, व्यवसाय करूनच माणसाची वृद्धी होत असते. कोकणात अफाट बुद्धिमत्ता आहे. परंतु तिचा वापर उत्कर्षासाठी, व्यवसायासाठी का केला जात नाही, हा प्रश्न आहे. कमी अर्थार्जनामुळे येथील जनता आर्थिक अडचणीत आहे. शेतीव्यवसायावर येथील नागरिकांनी भर दिला पाहिजे. आंबा, काजू, फणस, जांभूळ, चहापाती हे उत्पन्नाचे मोठे स्रोत आहेत. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. फणसाची बी आपण खातो तरी किंवा गुरांना टाकून देतो. परंतु त्या बीपासून बनवलेल्या पावडरी घालून अनेक पदार्थ तयार होतात. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, त्यासाठी आपले मंत्रालय सर्वातोपरी मदत करायला तयार आहे.
सध्या महिलांचा उद्योग व्यवसायात २० टक्केच हिस्सा असून तो ४० टक्के झाला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, महिलांसाठी विविध योजना मंत्रालयातर्फे राबवल्या जात असून, त्याचा फायदा घेऊन महिलांनी उद्योगिनी बनावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ५४ योजना आणल्या आहेत. ते पंतप्रधान झाले त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानी होती, आता ती पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले असून, आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, एमएसएमई डीएफओ नागपूरचे संचालक पी. एम. पार्लेवार, खादी ग्रामोद्योग आयोगाचे सीईओ विनीत कुमार, एमएसएमईच्या डी.आय.जी. अनुजा बापट, डीएफओचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट, एमएसएमईचे सहसंचालक अमित तमारिया, सहसंचालक गौरव कटारिया, मनोज शर्मा, सहायक संचालक व्ही. व्ही. खरे, राहूल मिश्रा, क्वायर बोर्ड विभागीय संचालक गीता भोईर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, पी. एम. विश्वकर्मा रत्नागिरीचे सदस्य अशोक मयेकर आदी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

