कोकणातील ७८७ वीजग्राहकांकडून ६५ लाख ८० हजारांच्या थकबाकीचा भरणा

रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी अभय योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेऊन रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब आणि उच्चदाब वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांचा भरणा केला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४७ ग्राहकांनी १२ लाख ९४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरदेखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज आणि विलंब आकाराची रक्कम माफ होत आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या, तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना येत्या ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता केवळ १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदार वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ३० हजार ३४९ ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ५२९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार ८२० ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply