बेतालपणाचा विक्रम

भारताने लोकशाही शासनप्रणाली स्वीकारली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. कोणीही कोठेही काहीही बोलू शकतो, भाषणे करू शकतो, लिहू शकतो, वृत्तपत्र प्रसिद्ध करू शकतो, पुस्तके लिहू शकतो, आपले मत व्यक्त करण्याची जी जी साधने आहेत त्या साऱ्यांचा उपयोग तो करू शकतो. हे स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याचा उपयोग करताना तारतम्य बाळगले पाहिजे, असा संकेत असतो. मात्र शतकाकडे वाटचाल सुरू केलेल्या आपल्या लोकशाहीने दिवसेंदिवस या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हीन पातळी गाठल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्र त्यात सर्वांत आघाडीवर आहे. कुणीही उठतो, कुणावरही टीका करतो, त्याच्या भाषेत त्याचे वाभाडे काढतो. एका ठरावीक मर्यादेपर्यंत हे सारे काही ठीक आहे. पण व्यक्तिगत आणि हीन पातळीवरील टीका कोणते टोक गाठू शकते, याची उदाहरणे आजकाल दररोज दिसू लागली आहेत. दीडशे वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अशीच मुक्ताफळे उधळण्याचा जणू विडाच उचलला आहे.
मुळात भारतीय जनता पक्षातून काँग्रेसकडे गेलेले आणि तेथे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध झाले होते. त्यांचा बेतालपणा इतका वाढला होता की त्यांना अलीकडे कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. काँग्रेसच्या वरिष्ठांनी मात्र या बेतालपणाची दखल घेतली आणि प्रदेशाध्यक्षपद हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केले. पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रारंभ केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्याच्या काळात त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामध्येच त्यांनी प्रचंड टीकेची हौस भागवून घेतली आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण कोणती पातळी गाठणार आहोत, याचे दर्शनच घडविले. राजकारणात टोकाचे मतभेद असू शकतात. परस्परविरोधी धोरणे राबविणारे पक्ष एकमेकांवर टीका करतात. लोकशाहीत ते अपेक्षितच असते. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूर शासक औरंगजेबाशी करून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या हीन विचारपातळीचे दर्शन घडविले.
राज्याच्या प्रमुख शासकाची औरंगजेबाशी तुलना करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या टीकेची दखल विधिमंडळात घेतली गेली. त्यावर योग्य तो निर्णय होईलच. पण एकट्या औरंगजेबाची टीका करून प्रदेशाध्यक्ष थांबलेले नाहीत, याचीही दखल घेतली गेली पाहिजे. औरंगजेबानंतरच्या काळात भारतात घडलेल्या अनेक घटनांनासुद्धा प्रदेशाध्यक्षांनी भाजपला जबाबदार धरले आहे. ‘भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्षे महाराजांची समाधी जनतेला कळू दिली गेली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार आणि कार्य लोकांना कळू नये, हा त्यामागचा डाव होता,’ अशी टीका श्री. सपकाळ यांनी केली. जेव्हा तो पक्ष अस्तित्वातही नव्हता तेव्हा त्या मनोवृत्तीची माणसे देशात होती असा त्यांचा दावा आहे. या टीकेला काय म्हणावे? बेतालपणाचा हा खरेच विक्रम आहे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या काँग्रेससारख्या वैभवशाली पक्षाची देशभरात वाताहत झाली आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी चांगल्या विचारसरणीचे नेते हवेत. त्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ हवे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भाजपवर प्रचंड टीका करणे एवढ्याच भांडवलावर पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकणार नाही. पण तेवढेच ध्येय पक्षाने ठेवले असले तर बेतालपणाचे आणखी विक्रमही लोकांसमोर येत राहतील, यात शंका नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २१ मार्च २०२५)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply