स्वामी स्वरूपानंद संस्थेची कर्जवसुली सलग १७ वर्षे ९९ टक्क्यांपेक्षा अधिक

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ कोटी ३२ लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) २८.७० टक्के असून, राज्यातील १५ हजार संस्थांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असेल. तसेच, सलग १७ वर्षे कर्जवसुलीचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर राखण्यातही संस्था यशस्वी झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आज (३१ मार्च) संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी ताळेबंद मांडण्याचा आपला पायंडा पतसंस्थेने यंदाही कायम राखला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात मिळून पतसंस्थेच्या १७ शाखा आहेत. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

ॲड. दीपक पटवर्धन यांनी या पत्रकार परिषदेत सरत्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. पतसंस्थेने या आर्थिक वर्षात १४.३४ टक्के व्यवसायवृद्धी केली. पतसंस्थेने कमालीचे सातत्य, प्रमाणबद्धता व विश्वासार्हता यांचा अर्थाविष्कार केला असून, संस्थेच्या सर्वच शाखांमध्ये व्यवसायवृद्धी झाल्याचे ॲड. पटवर्धन म्हणाले. संस्थेचा स्वनिधी ४८.१३ लाख रुपये झाला असून, ही संस्थेच्या प्रगतीतील मोठी कामगिरी आहे. कारण त्यामुळे एवढा निधी कोणत्याही शुल्काविना संस्थेला वापरता येतो. उपलब्ध साधनांचा पुरेपूर, शिस्तबद्ध आणि काटेकोर वापर आणि त्यात सातत्य हे संस्थेच्या यशाचे गमक असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी नमूद केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

ॲड. पटवर्धन म्हणाले, की आपला वसुली विक्रमाचा पायंडा अधिक मजबूत करून पतसंस्थेने या वर्षीही सर्व कर्जदारांच्या उत्तम सहकार्यामुळे ९९.७१ टक्के कर्जवसुली केली. ग्रॉस एनपीए (अनुत्पादित मालमत्ता) केवळ ०.६२ टक्के, तर निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात संस्था यशस्वी झाली. सलग १७ वर्षे संस्थेने आपली वसुली ९९ टक्क्यांच्या वर राखून एनपीए तरतूद लागू झाल्यापासूनच संस्थेने निव्वळ एनपीए शून्य टक्के राखला आहे. संस्थेच्या आठ शाखांची वसुली १०० टक्के झाली आहे.

या आर्थिक वर्षात १४.३४ टक्के व्यवसाय वृद्धी झाली. संस्थेचा सीडी रेशो (कर्ज आणि ठेवींचे प्रमाण) ६३.६७ टक्के इतका आदर्श प्रमाणात राहिला असून, भांडवल पर्याप्तता अर्थात सीआरएआर २८.७० टक्के इतका भक्कम राहिला आहे. याचा अर्थ संस्थेकडे जमा झालेला सर्व पैसा सर्वोत्तम विनियोगात आल्याने या वर्षी निव्वळ नफ्यात १८.३४ टक्के इतकी वाढ नोंदवून संस्थेने आठ कोटी ३२ लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केल्याचे पटवर्धन यांनी नमूद केले.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये १२.१४ टक्क्यांनी वाढ झाली असून, संस्थेच्या ठेवी ३४६ कोटी २१ लाख रुपये झाल्या आहेत. संस्थेच्या कर्जवितरणात १७.२० टक्के वाढ झाली असून, संस्थेने २५२ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज २३ हजार १९९ कर्जखात्यांच्या माध्यमातून दिले असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

संस्थेने स्टॅट्यूटरी (वैधानिक) गुंतवणूकही २५ टक्के प्रमाणात राखून १०० कोटी २७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. संस्थेने विविध कारणांसाठी निर्माण केलेल्या निधीपोटी ४८ कोटी ७३ लाख रुपये गुंतवणूक केली असून, संस्थेची एकूण गुंतवणूक १४९ कोटी रुपये झाली आहे.

सर्वच आघाड्यांवर स्वरूपानंद पतसंस्थेने अत्यंत उत्तम काम करून आर्थिक शिस्त काटेकोरपणे सांभाळून उत्तम रिझल्ट दिले आहेत. संस्थेची भक्कम आर्थिक स्थिती ही ठेवीदारांचा संस्थेवरचा विश्वास अधिक वृद्धिंगत करणारी असून, आपली ठेव गुंतवण्यासाठी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांचा गुंतवणूकदार प्राधान्याने विचार करतात. यामुळेच संस्थेकडे ८४ हजार ठेव खाती झाली आहेत. नवीन आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपयांचा ठेव टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून संस्था काम करील. नवीन आर्थिक वर्षात पाच नवीन शाखा मंजूर करून घेऊन, किमान तीन शाखांचा प्रारंभ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

पतसंस्था सध्या एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकते. ही मर्यादा पाच कोटींपर्यंत वाढ करण्याचा प्रयत्न करून नव्या कर्ज योजना सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संस्थेच्या व्यवहारांची, उपक्रमांची व सहकार जगताची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी जून २०२५ पासून सहकार स्वरूप नावाचे मासिक सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

संस्थेचा इमारत निधी २२ कोटी रुपयांचा झाला आहे. संस्थेच्या रत्नागिरीतील नव्या स्व-वास्तूच्या कामाचा प्रारंभ झाला असून, ही पाचमजली वास्तू वेगवान काम करून पूर्ण करण्यासाठी उचित यंत्रणा सक्रिय केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ग्राहक सभासदांनी दिलेले उत्तम सहकार्य, ठेवीदार सभासदांनी ठेवलेल्या ठेवी, कर्जदार सभासदांनी घेतलेले कर्ज व केलेली नियमित परतफेड, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी एजंट यांनी केलेले उत्तम काम या उत्तम सहकार शृंखलेमुळे संस्थेची उत्तम अर्थकारणाची परंपरा २०२४-२५ मध्येही तेजस्वी राहिली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतानाच स्वरूपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य राखून प्रमाणबद्ध आर्थिक व्यवहार शिस्तीने आणि विश्वासार्ह पद्धतीने केल्याने हे यश प्राप्त झाले, असे प्रतिपादन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

ऑनलाइन बँकिंगचा वाढता वापर पाहता पतसंस्थांनाही काळानुसार त्याचा अवलंब करावा लागणार आहे; मात्र सध्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयमध्ये पतसंस्थांचा समावेश नसल्याने कोणत्याही पतसंस्थेला थेट ऑनलाइन बँकिंग किंवा क्यूआर कोड पेमेंटसारख्या सुविधा देता येत नसल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले. ते होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply