रत्नागिरी : ‘समाजातील उणिवा दूर करा, समोर उद्दिष्ट ठेवा, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, वेळेचे योग्य व्यवस्थापन करा आणि त्यातून निकाल काय समोर येतो हेही पाहा. अशा कृतीतूनच यशस्वी उद्योजक होऊ शकता,’ असा कानमंत्र पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र वामन प्रभुदेसाई यांनी दिला. साधनेचे अधिष्ठान असल्यास स्वतःची आध्यात्मिक प्रगती तर होतेच आणि त्यातून उद्योगाचीही प्रगती साध्य होते, असेही त्यांनी स्वानुभवातून नमूद केले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने (पुणे) डॉक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे रविवारी राणी लक्ष्मीबाई सभागृहात सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पितांबरी उद्योग समूहाची वार्षिक दहा कोटींची उलाढाल झाली आणि एका कार्यक्रमात तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री मनोहर जोशी यांनी १०० कोटींची उलाढाल असलेला मराठी उद्योजक कोण आहे, असा प्रश्न विचारला. त्या वेळी एकही हात वर आला नाही आणि मी सांगितले, की पुढच्या दहा वर्षांत व्यवसाय वाढवतो. ५० कोटींवर व्यवसाय नेला; पण बाजारातून येणेबाकी राहू लागली. त्या वेळी डॉ. जयंत बालाजी आठवले यांनी गुरुमार्ग दाखवला. त्यानंतर उलाढाल १०० कोटींच्या वर केली. गुरूंच्याच आशीर्वादामुळे मला डॉक्टरेट मिळाली,’ असेही डॉ. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ व केजीएन सरस्वती फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे काम चांगले चालू असल्याचे सांगत, त्या दोन्ही संस्थांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत श्री. प्रभुदेसाई यांनी जाहीर केली.
संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई व संचालक सुयोगा जठार, प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, उमेश आंबर्डेकर, अॅड. प्रिया लोवलेकर, चंद्रकांत हळबे, दिलीप ढवळे, सुहास ठाकूरदेसाई यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन डॉ. प्रभुदेसाई यांचा सत्कार केला. केजीएन सरस्वती फाउंडेशनतर्फे चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई आणि अशोक घाटे यांनीही प्रभुदेसाई यांचा सन्मान केला. कीर्तनसंध्या परिवारातर्फेही अवधूत जोशी व सहकाऱ्यांनी श्री. प्रभुदेसाई यांचा सन्मान केला.
या प्रसंगी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते ‘कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन १९४७ मध्ये (कै.) विष्णू वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाबद्दल डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाविषयी मनोगत मांडले. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याविषयी अॅड. प्रशांत पाध्ये, डॉ. श्रीधर ठाकूर, प्रमोद कोनकर, ठाणे कऱ्हाडे संघाचे कार्यवाह संदीप कळके, इन्फिगो आयकेअरचे डॉ. श्रीधर ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.
कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास पुस्तकाची पाचवी आवृत्ती
कर्हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाचे लेखन (कै.) विष्णू वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन १९४७ मध्ये झाले होते. पुस्तकाची वाढती मागणी लक्षात घेता यावर्षी पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात कर्हाडे ब्राह्मणांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. कर्हाडे ब्राह्मणांचे कोकणात आगमन कसे झाले ते कोकणात कसे स्थायिक झाले, याविषयी माहिती देण्यात आली आहे. पाचव्या आवृत्तीत ज्ञातीबांधवांची आडनावे, गोत्रे, कुलदैवत, कुलदेवता व त्यांचे ठिकाण ही माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

