रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन आज (२१ जुलै) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, शिल्पाताई सुर्वे, शीतलताई बावस्कर, बिपिन बंदरकर, राजेंद्र शेटे, सुदेश मयेकर, राजेंद्र महाडिक, बाबू म्हाप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘रत्नागिरी हा संस्कारक्षम जिल्हा असून, खरे तर अशी बेघर निवारा केंद्रे उभी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी महिलांनी ब्रँड अँबेसेडर बनून समाजजागृती केली पाहिजे. राज्यात ८७ ठिकाणी अशी केंद्रे उभी राहणार आहेत. ज्येष्ठांना मानसन्मान देण्याच्या उद्देशाने या सर्व केंद्रांचे स्नेहमंदिर असे नामकरण केले पाहिजे. इथल्या ज्येष्ठांना सर्व चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांची चांगली काळजी घेतली गेली आणि विचारपूस केली गेली पाहिजे,’ अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. सामंत यांनी या वेळी व्यक्त केली. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी पाहणी करून केंद्रातल्या ज्येष्ठांशी संवाद साधला.
डॉ. सामंत म्हणाले, ‘बेघरांसाठी निवारा केंद्र असं मी म्हणणार नाही. स्नेहमंदिर म्हणू या. आम्ही ज्या गादीवर झोपतो, जी चादर वापरतो, तशीच इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे. करमणुकीसाठी स्वतंत्र टीव्ही असला पाहिजे आणि वातानुकुलित घरात राहिले पाहिजेत. त्यासाठी जे काही पैसे लागतील ते दिले जातील. ज्या मुलांना जन्म दिला, ती मुले ‘हे घर तुमच्यासाठी खुले नाही,’ असे आपल्या ज्येष्ठांना सांगतात, हे अत्यंत वाईट आहे. ही बाब मला इथे आल्यानंतर कळली. तुम्ही या ज्येष्ठांना घरातल्या माणसाप्रमाणे वागवले, तर त्यांचा शेवट आनंदामध्ये असू शकतो. इथे आलेल्या माणसाला वाटले पाहिजे, की माझ्या मुलाने काळजी घेतली नाही, माझ्या मुलीने काळजी घेतली नाही; पण नगरपालिकेने घेतली आणि त्यांच्यापेक्षा चांगली घेतली, अशा प्रकारच्या सुविधा घरात हव्यात. त्यासाठी, वडिलधाऱ्या माणसांना जपण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देण्याची माझी प्रवृत्ती आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांनी अशा केंद्राच्या ब्रँड अँबेसेडर बनावे. उद्घाटनावेळी इमारत जशी आहे, तशीच ती ३६५ दिवस राहिली पाहिजे. आपण घरात जेवढी सेवा करणार नाही, त्यापेक्षा दुप्पट सेवा आपल्याला इथे करावी लागणार आहे. महाराष्ट्रात ८७ ठिकाणी अशी केंद्रे उभी राहत आहेत. त्या सर्वांचे ‘स्नेहमंदिर’ नामकरण करण्याची मागणी मी करतो.’
‘रत्नागिरीची संस्कृती जपण्याचे काम महिला भगिनींनी करावे. आपल्या परिसरामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर त्याचे आत्मचिंतन सर्वांनीच केले पाहिजे. असा प्रकार घरामध्ये होता कामा नये. स्नेहमंदिरात आपले कोणी तरी म्हणून चौकशी करायला भगिनींनी जावे. अशा पद्धतीने आपण विचारपूस करायला आलो, तर खऱ्या अर्थाने पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये असे स्नेहमंदिर उभे राहता कामा नये, याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे,’ असेही सामंत म्हणाले.
मुख्याधिकारी गारवे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






