रत्नागिरी : रुग्णवाहिका बोलावण्यासाठी कॉल गेल्यानंतर रुग्ण लांब अंतरावर असेल, तर ४५ मिनिटांत आणि शहरी भागांत १५ मिनिटांत उपचार सुरू व्हायला हवेत. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पोलीस विभागाशी चर्चा करून रुग्णवाहिकांचे ठिकाण ठरवावे, अशा सूचना रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (२१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्या. या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यप्रणाली राबवण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचा, सर्व विभागांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या बैठकीत केली. सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसांत झाली याचा मागोवा घेता यावा, जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकासकामे, रुग्णवाहिकांना लागणारा सरासरी वेळ, रस्त्यांची दर दिवशीची स्थिती अशी जिल्ह्यातल्या प्रत्येक विभागाची माहिती एका क्लिकवर जनतेला मिळण्यासाठी हा एकत्रित डॅशबोर्ड आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हब कॉम टेक्नोसिस्टीमचे आदेश सुर्वे यांनी या डॅशबोर्डबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मालगुंड येथील नियोजित प्राणिसंग्रहालयाबाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, ‘सध्या पावसाळा सुरू आहे. या कालावधीत जे प्रशासकीय, कागदपत्रांचे कामकाज राहिले असेल, ते पूर्ण करून घ्यावे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात गतीने कामकाजाला सुरुवात व्हायला हवी. त्याबाबतचे सादरीकरण मुंबई येथे करावे.’
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


