रत्नागिरी : ‘मराठी आणि हिंदी पत्रकारितेची सुरुवात कोकणातून झाली आहे. आजच्या काळात वर्तमानपत्रांवर समाजमाध्यमांचे आक्रमण झाले आहे आणि समाजमाध्यमांमुळे प्रत्येक जण लेखक झालाय. पत्रकारितेचे स्वरूपही बदलत आहे. राजकीय भाषणांना ज्याप्रमाणे आचारसंहिता आवश्यक असते, त्याप्रमाणे या क्षेत्रातही कुठे तरी आचारसंहिता घालून घेण्याची गरज असून, त्याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं. त्यांच्या हस्ते आज संध्याकाळी (२२ मार्च) उशिरा रत्नागिरीत मिरजोळे एमआयडीसीमध्ये पत्रकार भवनाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. (फोटो, व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीतील पत्रकार उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून या पत्रकार भवनासाठी एक कोटी ३६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, एका वर्षात त्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ‘या पत्रकार भवनात अभ्यासिका, ग्रंथालय, निवासाची सोय, तसेच सभागृह असेल. आयएएस, आयपीएस अधिकारी घडवण्यासाठी या भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल,’ असेही पालकमंत्री म्हणाले. ‘अन्य जिल्हे, शहरे आणि राज्यांमध्ये आदर्श निर्माण होईल, असे कामकाज या माध्यमातून व्हायला हवे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘रत्नागिरीमध्ये महत्त्वाच्या जागेवर असलेल्या पत्रकार भवनच्या जागेचा प्रश्न ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन सोडवल्यास, त्या जागेसाठीही पाच कोटी रुपये दिले जातील. त्या ठिकाणीही राज्यातील एक अद्ययावत पत्रकार भवन उभे केले जाईल,’ असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी निवासी अभ्यास करण्यासाठी या पत्रकार भवनाचा निश्चित उपयोग होईल.’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती खरमाळे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. अलिमियाँ काझी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड












