सर्वसामान्यांच्या रूपात वावरणाऱ्या नवदुर्गांचा सत्कार

कुडाळ : सर्वसामान्यांच्या रूपात वावरणाऱ्या नवदुर्गांचा शोध घेऊन यावर्षीच्या नवरात्रोत्सवात ज्यांच्या जीवनावर ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले, त्याचा सत्कार येथील जिव्हाळा आश्रमात करण्यात आला.

‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि टाटा पॉवरच्या सहेली ग्रुपकडून तसेच ‘फ्रेम मी मीडिया’ आणि व्हर्चुअल व्हेलॉसिटी सॉफ्टवेअर सोल्युशनच्या सहकार्याने, कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून एक वेगळा उपक्रम यावर्षीच्या नवरात्रोत्सवात राबवण्यात आला होता. आदिशक्तीची आराधना करण्यासाठी नवरात्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. नवदुर्गांचा महिमा अगाध आहे. सामान्य जनतेमध्येही या नवदुर्गा वावरत असतात. त्यांचा शोध घेऊन आपापली कुटुंबे सांभाळतानाच नकळत जनसेवा करणाऱ्या महिलांच्या जीवनाची झलक दाखविणारे चित्रीकरण करण्यात आले. या उपक्रमात प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, सबलीकरण या विषयावर भर देण्यात आला. देवी मानल्या जाणाऱ्या आपल्या समाजातील स्त्रिया आणि त्या करत असलेल्या त्यांच्या ‘कामाचा गौरव’ ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेतून प्रसारित करण्यात आला. नवरात्री विशेष नऊ स्त्रियांचे कार्य व्हिडीओ स्वरूपात, नऊ वेगवेगळ्या भागात दाखविण्यात आले होते.

संगीत शिक्षिका योगिता तांबे निसर्गातून होणारा नाद आणि त्याला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करतात. विशेष म्हणजे त्या ७० हून अधिक पारंपरिक वाद्ये वाजवतात. गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर गड-किल्ले संवर्धनासाठी नऊवारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती जपतात. माया शृंगारे आपल्या शेतात रानभाज्या फुलवतात, त्यांचे संवर्धन करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरूपी रानभाज्यांचे मोफत वाटप करतात. सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या आणि एक स्त्री असून दशक्रिया विधी करणाऱ्या श्रद्धा कदम समाजाची वेगळ्याच प्रकारची सेवा करत आहेत. निसर्ग हाच आपला कॅनव्हास समजून निसर्गातून उपलब्ध झालेल्या साधनांचा वापर करून विविध कलाकृती तयार करणाऱ्या श्रुतिका पालकर निसर्गाला देव मानून आपली कला सादर करतात. आपल्या रुचकर हाताने भुकेलेल्यांची भूक भागवणाऱ्या नानी म्हणजे इंद्रायणी गावडे ८४ व्या वर्षीही ‘अन्नपूर्णा’ हे आपले नाव सार्थक ठरवत आहेत. महाराष्ट्रातील फुगडी हा खेळ मनोरंजन आणि शारीरिक जडणघडणीसाठी खेळल्या जातो. त्यातून आपली संस्कृती आणि परंपरा आरती परब जपत असतात. आपल्या आयुष्याची कळ सोसत ‘कळसूत्री’ आणि ‘चित्रकथी’ रूपातील बाहुल्यांचे आदिवासी कलाप्रकारातील खेळ सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतानाच समाजप्रबोधन करणाऱ्या तनुश्री गंगावणे आपला ‘ठाकर’ वारसा जपत आहेत. आपल्या प्रेमाचा जिव्हाळा कायम ठेवत वृद्धाश्रम चालवणाऱ्या आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून जगणाऱ्या श्रेया बिर्जे यांचे कार्यही कौतुकास्पद आहे.

आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या या नऊ दुर्गांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी नवरात्रोत्सवात व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली होती. तिचे दिग्दर्शन सुमित पाटील आणि किशोर नाईक यांनी केले आहे. छायाचित्रण आणि संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव, यांनी सांभाळले आहे. लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. त्यांना संकेत कुडाळकर, साक्षी खाड्ये, धीरज कादवडकर, मंगल राणे, अभिषेक तेंडुलकर, भरत शिंदे यांनी अमोल सहकार्य केले. यातील विशेष बाब म्हणजे या सगळ्या स्त्रियांना मराठी चित्रपटसृष्टीतील दीप्ती भागवत, स्पृहा जोशी, तन्वी पालव, ऋतुजा बागवे, सुरुची आडारकर, नयना आपटे, अश्विनी कासार, विमल म्हात्रे, चिन्मयी राघवन या अभिनेत्रींनी आपला आवाज दिला आहे. या मालिकेचे सर्व भाग प्रसारित झाले असून जगभरातील ५१ लाखांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले आहेत.

या नवदुर्गांचा सत्कार कुडाळ येथे करण्यात आला. प्रतिमा नाटेकर, वैद्य सुविनय दामले आणि चित्रकार सुनील नांदोस्कर यांनी सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम केला.

या नवदुर्गांची अधिक माहिती वाचण्यासाठी आणि अन्नपूर्णा नानींचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा – https://kokanmedia.in/2020/10/17/mahilajagar/

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply