राजापूरमध्ये उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी संधी

राजापूर : राजापूर येथे स्थानिक किमान २० उद्योजकांसाठी पर्यावरणपूरक उद्योग, व्यवसाय उभारण्याचा प्रकल्प यूएमईओ कंपनीने हाती घेतला आहे. त्यासाठी तरुणांनी संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

करोनाच्या काळात अऩेकांचे रोजगार गेले. व्यवसाय बंद पडले. अशा स्थितीत मराठी तरुणांनी व्यवसायात यावे, यासाठी काही मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन युनायटेड मराठी एन्टरप्रेन्युअर्स ऑर्गनायझेशन (यूएमईओ) ही कंपनी स्थापन केली आहे. प्रामुख्याने कोकणातील तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन करायचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे स्थानिक किमान २० उद्योजकांसाठी पर्यावरणपूरक उद्योग, व्यवसाय उभारण्याचा प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे.

कंपनीचे प्रमुख संचालक प्रकाश गावकर यांनी याबाबतची माहिती दिली. पूर्वी मागासलेल्या पण आता दळणवळणाच्या दृष्टीने प्रगत झालेल्या कोकणातील तरुणांनी काळानुसार उद्योग-व्यवसायात उतरले पाहिजे, अशी त्यांची तळमळ आहे. त्यातूनच त्यांनी यूएमईओ कंपनीतर्फे कोकणातील तरुणांना उद्योग उभारणीचे आवाहन केले आहे. करोनामुळे कोकणातील अनेक तरुणांचा रोजगार गेला. मुंबईतील कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांनी गावाची वाट धरली. मात्र तेथे जाऊनही अल्प उत्पन्नावर नोकरी करण्यापेक्षा किंवा मुंबईत लहान सहान नोकऱ्या करून आयुष्य घालविण्यापेक्षा कोकणात उद्योजक व्हावे, अशी कंपनीची कल्पना आहे. आपल्या गावातच राहून विविध शासकीय सवलतींचा फायदा घेऊन, छोटे-मोठे पर्यावरणपूरक उद्योग, व्यवसाय केले, तर रोजगाराची मोठी समस्या तर सुटेलच, पण इतर अनेकांना रोजगार मिळू शकेल.

निसर्गसुंदर कोकणात आंबा, काजूवरील परंपरागत प्रक्रिया उद्योग आहेतच, पण त्यापलीकडे जाऊन कोकणातील तरुण इतर उद्योगातदेखील उतरू शकतात. स्टेनलेस स्टीलची भांडी, काटेचमचे, कागदी वस्तू, विजेची उपकरणे, फरसाण, चिक्की, चॉकलेट, आंबा प्रकिया, काजू प्रकियायुक्त पदार्थांसारखे खाद्यपदार्थ इत्यादी व्यवसाय ते उभारू शकतात. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य कंपनीतर्फे केले जाणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करणे, शासकीय अनुदान मिळवून देणे यासाठीही कंपनीतर्फे मदत केली जाईल.

गरज पडल्यास कंपनीकडून परिस्थितीनुसार भागभांडवल स्वरूपात गुंतवणूक करण्यात येईल. तयार झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, उत्पादनांची जाहिरात करणे इत्यादी माध्यमातून व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनी मदत करणार आहे. मुंबईतील तरुणांनाही गावी जाऊन आपला उद्योग स्थापन करता येऊ शकेल. या साऱ्यांसाठी कंपनीने केलेल्या गुंतवणुकीची परतफेड उद्योजकांकडून उद्योग चांगल्या प्रकारे सुरू झाल्यावर परतावा स्वरूपात कंपनीकडून घेतली जाईल.

ज्यांचे शिक्षण चालू आहे आणि ज्यांना पुढे उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, अशा कोकणातील होतकरू तरुणांना कंपनीमध्ये हिशेब, टॅक्सेशन, मार्केटिंग, एचआर, व्यवस्थापन अशा कामांसाठी गरजेनुसार समाविष्ट करून घेतले जाईल. शिक्षण सुरू ठेवूनही अशी अनेक कामे करता येऊ शकतील. कमवा आणि शिका अशा स्वरूपाच्या या योजनेचाही अनेक तरुणांना फायदा होऊ शकेल. शिक्षण सुरू असताना जे उद्योग सुरू करू इच्छितात, कंपनीची कामे करू इच्छितात, ज्यांना कारखाना सुरू करण्याची इच्छा आहे, अशा होतकरू तरुणांना कंपनीतर्फे प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात विरार, नालासोपारा भागात पहिला प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. गेल्या जुलैमध्ये नालासोपारा येथील कार्यालयापासून कामाला सुरुवात केली. आता दुसरा प्रकल्प राजापूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवउद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश गावकर (8356049477) किंवा वैभव जाधव (8390132865) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply