रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातला केंद्रीय आयुष मंत्रालयाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लॅन्ट कोकणाबाहेर जाऊ देऊ नये, असे गाऱ्हाणे रत्नागिरीतील भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. विलास पाटणे यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना घातले आहे. याबाबतचा पाठपुरावा करण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
श्री. तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड झाल्यानंतर ते नुकतेच प्रथमच रत्नागिरीत आले होते. दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अॅड. पाटणे यांनी याबाबतचे मनोगत व्यक्त केले. आडाळी (ता. दोडामार्ग) येथे आयुष मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लॅन्ट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी हिरवा कंदील दाखवला गेला होता. त्यासाठी आयुष मंत्रालयाने मंजुरी दिल्याप्रमाणे प्रकल्पाला तातडीने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक होते. प्रकल्पामुळे कोकणातील औषधी वनस्पतींवर संशोधन होऊन त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो, हे लक्षात घेऊनच प्रकल्प उभारले जाणे आवश्यक होते. हा प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मध्यंतरी केली होती. त्यामुळे शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी श्री. देशमुख यांच्यावर टीका केली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. सिंधुदुर्गातून प्रकल्प पळविण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असेही श्री. राऊत यांनी बजावले होते. मात्र त्याबाबत पुढे काहीच झाले नाही.
दरम्यान, श्री. पाटणे यांनी केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. श्री. नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेल्या ५ ऑक्टोबरला स्मरणपत्र लिहून प्रकल्पाकरिता जागा देण्याची विनंती केल्याची बाब या भेटीतून पुढे आली. तरीही वर्षभर प्रकल्प जमिनीअभावी लटकला आहे. आडाळीच्या एमआयडीसीमध्ये शंभर एकर जागा प्रकल्पासाठी हवी आहे. ती महाराष्ट्र सरकारने दिली नाही, तर प्रकल्प अन्यत्र हलवायला परवानगी मिळणार नसल्याचे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले आहे, असे श्री. पाटणे यांनी सांगितले. ते म्हणाले, मुळात लातूरमध्ये प्यायला पाणीपुरवठा मिरजेहून ट्रेनने करावा लागतो, अशा लातूरमध्ये हे संशोधन केंद्र नेण्यामध्ये राज्य सरकारचा हेतू अनाकलनीय आहे. लातूरला झाडे नाहीत. वनस्पतीच नाही, तर औषधी वनस्पती कोठून येणार? शिवाय आयुर्वेद आणि औषधी वनस्पती याची कोकणला मोठी परंपरा आहे. त्यामुळेच आडाळीच्या मंजूर आयुर्वेद संशोधन केंद्राला तातडीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे. श्री. तावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय चिटणीस या नात्याने याबाबत विचार करावा, अशी अपेक्षा श्री. पाटणे यांनी व्यक्त केली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
