कोकणातील कवीलाही मिळू शकते एका कवितेसाठी वीस हजारांचे पारितोषिक

रत्नागिरी : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील साहित्यप्रेमी मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या कवितालेखन स्पर्धेत भाग घेतला तर कोकणातील कवीसुद्धा एका कवितेसाठी वीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळू शकतो. त्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमेश्वरनगर येथील साहित्यप्रेमी मंडळाने ही राज्यस्तरीय खुली कवितालेखन स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी-कवयित्री तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील स्वतः लिहिलेल्या कविता पाठविण्याेचे आवाहन आयोजकांनी केले आहे. उत्कृष्ट कवितांसाठी पहिले २० हजाराचे पारितोषिक दिले जाणार असून याशिवाय १५ हजार, १० हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपये अशी पाच पारितोषिके, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाणार आहे. स्पर्धेकरिता कवींनी आपण स्वतः लिहिलेल्या दोन कविता सुवाच्य अक्षरात किंवा टंकलिखित करून पाठवाव्यात. संपूर्ण पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटोही सोबत पाठवावा. स्पर्धेसाठी सोळा ते वीस ओळींची एक किंवा दोन कविता पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत कवितेची निवड झाली नाही, तरी निवडक ५०० कवितांचा समावेश काव्यसुगंध या राज्यस्तरीय प्रातिनिधिक कवितासंग्रहात करण्यात येणार आहे.

याशिवाय राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार आणि राज्यस्तरीय जीवनसाधना पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यातील साहित्यरत्न पुरस्कारासाठी प्रतिभावंत लेखक, कवी, साहित्यिकांनी आपले दर्जेदार कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मकथन, चरित्र, आत्मचरित्र, संशोधनपर शोधनिबंध, संपादित, अनुवादित इत्यादी प्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्यकृतीच्या दोन प्रती, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती तसेच भ्रमणध्वनीही कळवावा. जीवन साधना पुरस्कार महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, प्रकाशन संस्था, आदर्श शिक्षक-शिक्षिका इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो. त्यासाठीही परिपूर्ण माहिती पाठवावी.

स्पर्धेतील कविता तसेच साहित्यरत्न आणि जीवनसाधना पुरस्कारांसाठी येत्या २५ डिसेंबरपर्यंत प्रा. हनुमंत वि. माने, संस्थापक-अध्यक्ष, साहित्यप्रेमी मंडळ, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे 412306 या पत्त्यावर माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी 8329252962 किंवा 9665009740 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply