कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू

पुणे : कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी सात डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियानास प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरू केला आहे. ‘कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,’ असे कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.

‘कोकणामधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून यावर गेल्या दहा वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली वाहून कोकण हायवे समन्वय समितीच्या ‘समृद्ध कोकण महामार्ग अभियान’ या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत आहे,’ असे यादवराव यांनी सांगितले.

‘गणपती आणि अन्य उत्सवांच्या निमित्त कोकणात आपल्या गावी जाणारे हजारो कोकणी बांधव आजपर्यंत या रस्त्यावर मृत्युमुखी पडले. पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला महामार्ग कारणीभूत आहे,’ असे यादवराव म्हणाले. उत्कृष्ट दर्जाच्या आणि देशातील सुंदर समृद्ध कोकण महामार्गासाठी सातत्यपूर्ण अभियानाचा संकल्प करण्यात आला.

‘देवभूमी कोकणात दर्जेदार कोकण हायवे हा आमचा अधिकार आहे आणि त्याचे अभियान आता सुरू झाले आहे. ओपन हायवेवर असंख्य समस्या आहेत. त्या संपूर्ण माहितीचे संकलन कोकण हायवे समन्वय समिती करणार आहे. जेवढा पाऊस मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पडतो, तेवढाच पाऊस कोकण हायवेवर पडतो. मग दर वर्षी कोकण महामार्गावर दोन-चार फुटांचे खड्डे कसे काय पडतात? सहा महिने खड्ड्यांचा रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्षे चालणार,’ असा सवाल संजय यादवराव यांनी केला.

पळस्पे ते पोलादपूर या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी आणि अभ्यास समितीच्या सदस्यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी, एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा, असे आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.
यशवंत पंडित, अॅड. ओवेस पेचकर, विकास शेट्ये, विलास नाईक, अॅड. मंगेश नेने, संतोष ठाकूर, सुरेश म्हात्रे, नीलेश म्हात्रे, इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply