अलोरे येथे कोयनेच्या चौथ्या टप्प्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

रत्नागिरी : आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सातारा जिल्ह्यातील भागाबरोबरच त्यांनी आज अलोरे (ता. चिपळूण) येथील प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील विद्युतगृहाच्या पाहणी केली. त्यादरम्यान ते बोलत होते. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. त्यासाठी कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्या वेळी सर्व मिळून या टप्प्यातून १९२० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प राज्य विद्युत मंडळाकडून चालविला जातो. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा असून तो अलोरे (ता. चिपळूण) या गावापर्यंत आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पद्धने एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी प्रकल्पाविषयी सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून जाणून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

कोयना प्रकल्पातून भुयारी मार्गाने मुख्यमंत्री अलोरे येथील भुयारात असलेल्या विद्युतगृहापर्यंत आले आणि तेथून त्याच मार्गाने ते परत गेले. यावेळी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीजनिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply