रत्नागिरी : नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे केवळ गुण मिळविण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्या भाषेचा विविध अंगांनी अभ्यास करायला मोठा वाव मिळणार आहे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या कल्पना आठल्ये यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षण सेवक पतपेढीत हा कार्यक्रम झाला. समारंभाचे आणि माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सुनील गौड यांनी यावेळी सांगितले की, संस्कृत भाषेतूनच हिंदी या भाषेचा उगम झाला आहे. म्हणूनच संस्कृतला भारतीय भाषांची जननी म्हटले जाते.
रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ दरवर्षी दहावीच्या परीक्षेत संस्कृत विषयात ५० पैकी ४८ आणि त्याहून अधिक, तसेच १०० पैकी ९५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा समारंभ झाला. विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या यशाची आठवण कायम राहावी, म्हणून यावर्षी प्रथमच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संस्कृत मंडळाकडून घेण्यात आलेल्या ऑनलाइन पठण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली.
जागुष्टे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र इनामदार, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा इनामदार, रवींद्र पाटणकर तसेच संस्कृत शिक्षक यावेळी उपस्थित होते. संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखा इनामदार यांनी संस्कृत शिक्षक मंडळाच्या नोंदणीचे काम झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
समारंभाचे सूत्रसंचालन कौस्तुभ फाटक, सौ. अक्षया भागवत यांनी केले, तर सौ. रेखा इनामदार यांनी आभार मानले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या शाळांची संस्कृत विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे घ्यायची राहिली आहेत, त्यांनी तसेच ऑनलाइन पठण स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांची प्रमाणपत्रे रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळाच्या कार्यालयातून घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौ. रेखा इनामदार (9421233764) यांच्याशी संपर्क साधावा.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
