कीर्तनालंकार सौ. विशाखा भिडे यांचा रत्नागिरीत सत्कार

रत्नागिरी : येथील नारायणी मंडळाच्या प्रमुख सौ. विशाखा मोहन भिडे यांनी कीर्तन क्षेत्रातील कीर्तनालंकार ही पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केली. ही पदवी मिळवणाऱ्या रत्नागिरीतील त्या पहिल्या महिला असून त्यानिमित्ताने नारायणी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सौ. वंदना घैसास यांच्या घरी झालेला हा समारंभ करोनाच्या वातावरणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. सौ. घैसास यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रथम सौ. भिडे यांचे औक्षण करून त्यांची ओटी भरण्यात आली. यावेळी श्रीसूक्त पठणाने वातावरणनिर्मिती करण्यात आली.

सौ. भिडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय उपस्थित महिलांनी करून दिला. सौ. चितळे म्हणाल्या, २००० सालापासून सप्तशतीचा अभ्यास सौ. विशाखाताईंकडे त्यांनी सुरू केली. आजपर्यंत विविध स्तुतिस्तोत्रे पठण त्यांच्या वर्गात सुरू आहे. मैत्री या विषयावर ताईंनी केलेल्या उत्कृष्ट कीर्तनाच्या आठवणी सौ. वेदक यांनी करून दिल्या. विशाखाताईंच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू, अभिनय, गायन, सादरीकरण उत्साहाने विषय मांडण्याची धाटणी आदींवर सौ. जोशी यांनी प्रकाश टाकला. ताईंच्या मंडळाच्या कार्याने प्रभावित होऊन आपल्या सौ. अभ्यंकर या मैत्रिणीच्या ओळखीने अलीकडेच आपण मंडळात सहभागी झाल्याचे सौ प्रभुदेसाई यांनी सांगितले. सर्वांना आपल्या बरोबर घेऊन नवनवीन उपक्रम करणाऱ्या विशाखाताई सर्वांना प्रेरित करतात, असे सौ. अभ्यंकर यांनी सांगितले. सौ. विशाखाताईंकडून सप्तशती आणि भगवद्गीता पाठांतराची प्रेरणा मिळाल्याचे सौ. पटवर्धन म्हणाल्या. वाणी रसवती यस्य, यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य, सफलम् तस्य जीवितम हे सुभाषित सौ. विशाखाताईंच्या व्यक्तिमत्त्वाला तंतोतंत लागू पडत असल्याचे सौ. घैसास यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना सौ. भिडे यांनी मंडळातील भगिनींच्या स्तुतिसुमनांनी भारावून गेल्याचे सांगितले. पुण्यात १९८० साली कीर्तन शिक्षण घेऊन मिळालेल्या पहिल्या संधीपासून कीर्तन अलंकार पदवी मिळेपर्यंतच्या आपल्या वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. परीक्षेसाठी क्रांतिकारक अनंत कान्हेरे हा विषय देण्यात आला होता. कीर्तनाच्या बहुतेक सर्व अभ्यासाची झलक दाखवण्याची संधी या विषयातून मिळाल्याचे आणि त्याचे सार्थक होऊन परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply