महाराष्ट्रातील पहिली झिपलाइन लवकरच देवगड किनाऱ्यावर सुरू

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि फ्लाईंग कोकण अॅडव्हेंचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड समुद्रकिनार्‍यावर लवकरच झिपलाइन सुरू होणार आहे. संचालक आणि फ्लाईंग कोकण अॅडव्हेंचर क्लबचे प्रमुख श्रीकांत जोईल यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. देवगडच्या समुद्रकिनार्‍यावर अशा प्रकारची झिपलाइन महाराष्ट्रात प्रथमच सुरू होत आहे.

श्री. जोईल म्हणाले, महाराष्ट्रातील पहिली झिपलाइन असल्याने पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओढा या प्रकल्पाकडे येईल. मी भूमिपुत्र असून देवगडच्या भूमीत पर्यटनासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा माझ्या मनात होती. त्याला आमदार नीतेश राणे यांची जोड मिळाली. त्यामुळे झिपलाइनच्या माध्यमातून मी देवगडवासीयांच्या सेवेत उतरलो आहे. ही संकल्पना तीन वर्षांपूर्वी मी मांडली होती. मात्र करोना लॉकडाउनच्या काळात मी देवगडमध्ये आलो आणि मला ती प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे.

सिंधू सह्याद्री अॅडव्हेंचर संस्थेचे प्रमुख रामेश्वर सावंत यांनी यावेळी सांगितले की, प्रकल्प अत्यंत सुरक्षित आहे. प्रकल्पामध्ये वापरलेले दोर स्टीलचे असून एका वेळी एक हजार ८०० किलो वजन पेलण्याची क्षमता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व चाचण्या पार केलेली ही यंत्रणा लवकरच देवगडवासीयांच्या सेवेत येणार आहे. स्थानिकांना व पर्यटकांना परवडेल एवढ्या कमी पैशात झिपलाइनचा आनंद घेता येणार आहे.

पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजा वालकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे, वैष्णवी जोईल उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply