रत्नागिरी : रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय पांडुरंग जोशी यांनी लिहिलेल्या शेततळ्यातील आणि तलावातील मत्स्यशेती – तंत्र आणि मंत्र या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन पद्धतीने १७ डिसेंबरला रत्नागिरीत झाले. हे पुस्तक म्हणजे मत्स्यशेतीची ग्रामगीता ठरेल, अशा शब्दांत राज्यभरातल्या मान्यवरांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुस्तकाची महती सांगितली. (कार्यक्रमाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

डॉ. जोशी यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे (ता. कुडाळ) येथील संशोधन केंद्रातील मत्स्यसंवर्धन प्रकल्प प्रमुख डॉ. नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुस्तकात १२ प्रकरणे आहेत. मत्स्यशेतीविषयीच्या प्राथमिक माहितीपासून शासनाच्या विविध योजनांपर्यंतची माहिती पुस्तकात समाविष्ट आहे. माशांच्या जाती, खाद्य, कोणते पाणी वापरावे, शेतकऱ्यांनी ते कसे ओळखावे, माशांचे रोग, त्यावरची उपाययोजना, तलावांचे बांधकाम, यंत्र, उपकरणे कोणती, ती कोठे मिळतात, मासे काढणीपश्चात तंत्रज्ञान, विक्री असा प्रत्येक गोष्टीचा बारकाव्याने विचार पुस्तकात करण्यात आला आहे. ज्याला गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन करायचे आहे, व्यवसाय करायता आहे, त्याला १६० पानांचे पुस्तक पथदर्शक ठरेल. या पुस्तकात शेतकऱ्यांना आवश्यक ते सारे काही आहे. तळ्यासाठी कागद कोणता, किती जाडीचा वापरावा, त्याची सध्याची किंमत काय आहे, अशा बारकाव्यांचाही त्यात विचार केला आहे. जे मुळात मत्स्यशेती करत आहेत, त्यांनाही तंत्राची ओळख होणार आहे. यापुढील काळात मत्स्यशेतीचा आवाका वाढणार आहे. मत्स्यशेतीला चांगले दिवस येणार आहेत. त्यासाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त ठरणार आहे.
पुस्तकाच्या लेखनाविषयी डॉ. जोशी म्हणाले की, मत्स्यशेतीविषयीचे पुस्तक इंग्रजीत लिहिले, पण त्याचा सामान्य शेतकऱ्यांना उपयोग होणार नाही, हे लक्षात घेऊन ते मराठीत लिहिले. नवचैतन्य प्रकाशनाचे श्री. मराठे यांच्याशी संपर्क साधला. एकाहून एक दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशक असलेले श्री. मराठे यांनी त्वरित माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी होकार दिला. पुस्तक लिहिताना सर्वत्र पसरलेल्या शेतकऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार विषय हाताळले आहेत. त्यामुळे ते साऱ्यांनाच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आहे. मात्र मत्स्यशेतीमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला, मेहनत, सिस्टिमेटिक अॅप्रोच म्हणजेच उत्कृष्ट व्यवस्थापनाची त्रिसूत्री अमलात आणायला हवी, असा सल्ला डॉ. जोशी यांनी दिला.
प्रकाशन समारंभात आभासी पद्धतीने सहभागी झालेले बेडग (ता. मिरज, जि. सांगली) येथील मत्स्यशेतकरी डॉ. रवींद्रराज शेळके यांनी सांगलीतील दुष्काळी भागात मत्स्यशेतीकरिता डॉ. विजय जोशी यांचे मार्गदर्शन किती उपयुक्त ठरले, त्याची माहिती दिली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील काही भाग दुष्काळी आहे. तेथे शासनाच्या योजनेतून शेततळी निर्मिती केली. बराच काळ या शेततळ्याचा वापर फक्त शेतीसाठी करत होतो. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न जेवढ्यास तेवढेच मिळत होते. खर्च आणि उत्पन्नाचा तितकासा मेळ बसत नव्हता. त्या दरम्यान २०१७ साली २५ शेतकऱ्यांनी एकत्र यायचे ठरवले. त्यातूनच शेततळ्यात मत्स्यशेतीसाठी खरोखरीच उपयुक्त आहे का, याचा विचार केला. डॉ. जोशी यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभले. ते खूपच उपयोगाचे ठरले. कारण शेतीतज्ज्ञ छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांना कसे मार्गदर्शन मिळणार, हा प्रश्न आहे. अधिकारीही शेतकऱ्यांना वेळेवर भेटत नाहीत. अशा स्थितीत मत्स्यशेती करायची झाली, तर त्यांच्यासाठी डॉ. जोशी यांचे हे पुस्तक खूपच उपयोगाचे आहे. त्यांनी छोट्यात छोट्या शेतकऱ्यांचा आणि बारीकसारीक समस्यांचा विचार करून हे पुस्तक लिहिले आहे.
बँकेतील अधिकारी अरुण अलासे म्हणाले की, मी एक बँकर आहे. माझा शेतीशी थेट संबंध नाही. पण शेतीसाठी कर्ज देताना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी डॉ. विजय जोशी यांची खूपच मदत झाली. त्यातूनच एमपेडाचा पहिला प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. डॉ. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक मत्स्यशेतीसाठी हँडबुक ठरणार आहे. मत्स्यशेती करताना समस्यांवर ताबडतोब उपाययोजना केली, माशांच्या आजारावर वेळीच उपचार केले तर त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. यापुढील काळात एकत्र येऊन शेती करण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर माशांना मोठी मागणी आहे. एकत्रित शेती केली, तरच ते उद्दिष्ट गाठणे यशस्वी होणार आहे. जोशी सरांच्या पुस्तकामुळे ते शक्य आहे. देश घडवायची ताकद ज्या मत्स्यशेतीमध्ये आहे. तिचा उपयोग व्हायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पुस्तक पोहोचले पाहिजे. तरच महाराष्ट्रात मत्स्यशेती यशस्वी होईल, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल.
पुस्तकाचे प्रकाशक नवचैतन्य प्रकाशनचे शरद मराठे यांनी सांगितले की, मत्स्यशेतीला आता खूप चांगले दिवस येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. जोशी यांचे त्या विषयावरचे चांगले पुस्तक प्रकाशित करायाल संधी मिळाली, याचा मला आनंद आहे.
पुणे आणि नाशिक विभागाचे प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त अभय देशपांडे यांनी डॉ. जोशी यांचे पुस्तक म्हणजे मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत ग्रामगीता आहे, अशा शब्दांत पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ज्याच्याकडे जलक्षेत्र उपलब्ध आहे, ज्याला मत्सशेती करायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. मत्स्यशेतीच्या सर्वच गोष्टींचा मागोवा, परामर्श या पुस्तकात घेतला गेला आहे. संशोधन, विकास, प्राध्यापकीय असा विविध प्रकारचा अनुभव असलेल्या डॉ. जोशी यांच्या लेखणीतून हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यांच्या ज्ञानाचे, अनुभवाचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांचे प्रॅक्टिकल आणि थिरॉटिकल ज्ञान उत्तम आहे. विस्तार शिक्षणाचा उपक्रम विद्यापीठांनी राबवायचा असतो. तो राबवत असताना निर्माण होणाऱ्या त्रुटी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय वरदान कसा ठरेल, याचा विचार करून पुस्तक लिहिले आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी तर पुस्तकाचा मोठा फायदा होणार आहे. देशाच्या दृष्टीने माइलस्टोन ठरणारी ती योजना राबवताना या पुस्तकाचा उपयोग केला, तर पुढील काळात निर्माण होणारी खाद्यान्नाची कमतरता शाश्वतपणे दूर होणार आहे. प्रथिनयुक्त खाद्याची गरज भागवताना मत्स्यशेती करणाऱ्या गरिबांच्या चेहऱ्यावर फुटणारा हसू लक्षात घेतले, तर हे पुस्तक म्हणजे स्माइलस्टोन योजना ठरणार आहे. अलीकडच्या काळात दांभिक तंत्रज्ञांचा सुळसुळाट झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरही डॉ. जोशी करत असलेले काम उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत श्री. देशपांडे यांनी डॉ. जोशी यांचा गौरव केला.
समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी) येथील मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांनी भूषविले. त्यांनीही डॉ. जोशी यांच्या पुस्तकाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पुरेशा मनुष्यबळाअभावी मत्स्यशेतीचे विस्तार कार्य तळागाळापर्यंत पोहोचत नाही. डॉ. जोशी यांच्या पुस्तकामुळे ती त्रुटी दूर होणार आहे. मत्स्यविषयक तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यातील दरी नाहीशी होणार आहे. डॉ. जोशी यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचता येईल. तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पुस्तक आहे. वारंवार शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर पुस्तकार प्रकाश टाकला आहे. पुस्तक प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांच्या साऱ्या अडचणी दूर होतील. डॉ. जोशी यांनी संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना सर्व समस्यांची जाण आहे. त्यातून त्यांनी परिपूर्ण पुस्तक लिहिले आहे. यापुढील काळातही त्यांनी निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, गोड्या पाण्यातील कोळंबी अशा विविध विषयांवरील पुस्तके लिहावीत, अशी अपेक्षा डॉ. शिंगारे यांनी व्यक्त केली.
डॉ. जोशी यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा यांनी पुस्तकाच्या निर्मितीविषयी कौटुंबिक अनुभव सांगितले. स्नुषा डॉ. स्नेहल यांनीही मनोगत व्यक्त केले. पुत्र डॉ. प्रथमेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातील तज्ज्ञ, तसेच शेतकरी उपस्थित होते. (कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)
(डॉ. विजय जोशी : 9423291434)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड