रत्नागिरी : समृद्ध कोकण राष्ट्रीय महामार्ग संकल्प पाहणीला आज हातखंबा येथून सुरवात झाली. हॉटेल अलंकार येथे समारंभपूर्वक सुरू झालेल्या दौऱ्यापूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संजय यादवराव यांनी दौऱ्यासंदर्भात माहिती दिली.
मुंबई ते गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकर व दर्जेदारपणे पूर्ण होण्याकरिता हा दौरा सुरू झाला आहे. कोकणातील महामार्गाच्या दहा वर्षे रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुराव्यासाठी गेल्या ७ डिसेंबरपासून समृद्ध कोकण महामार्ग अभियान सुरू झाले. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकणवासीयांच्या समितीने हा अभ्यासदौरा सुरू केला आहे. कोकणात दर्जेदार हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे, अशी कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण महामार्ग अभियानाचे प्रणेते संजय यादवराव यांची भूमिका आहे.
कोकणामधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून यावर गेल्या दहा वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली वाहून कोकण हायवे समन्वय समितीच्या ‘समृद्ध कोकण महामार्ग अभियान’ या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात झाली. राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत आहे. गणपती आणि अन्य उत्सवांच्या निमित्त कोकणात आपल्या गावी जाणारे हजारो कोकणी बांधव आजपर्यंत या रस्त्यावर मृत्युमुखी पडले. पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला महामार्ग कारणीभूत आहे. उत्कृष्ट दर्जाच्या आणि देशातील सुंदर समृद्ध कोकण महामार्गासाठी सातत्यपूर्ण अभियानाचा संकल्प करण्यात आला आहे.
देवभूमी कोकणात दर्जेदार कोकण हायवे हा आमचा अधिकार आहे आणि त्याचे अभियान आता सुरू झाले आहे. ओपन हायवेवर असंख्य समस्या आहेत. त्या संपूर्ण माहितीचे संकलन कोकण हायवे समन्वय समिती करणार आहे. जेवढा पाऊस मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पडतो, तेवढाच कोकणात पडतो. मग दर वर्षी कोकण महामार्गावर दोन-चार फुटांचे खड्डे कसे काय पडतात, सहा महिने खड्ड्यांचा रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्षे चालणार, असा सवाल संजय यादवराव यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी, एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा, असे आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.
आज दौऱ्यातील सदस्य हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे आले. तेथे झालेल्या कार्यक्रमात हॉटेल असोसिएशनचे सचिव आणि हॉटेल अलंकारचे मालक आप्पा देसाई, मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, हॉटेल जी ढाबाचे मालक गौरव गांधी, मुकुंदराव जोशी, राजू भाटलेकर, शिरीष झारापकर, इंजिनीयर जगदीश ठोसर, बांधकाम तज्ज्ञ यशवंत पंडित, ऋषिकेश कोळेकर, नित्यानंद पाटील, किरण कोळेकर, आंबा बागायतदार प्रकाश डुकळे, रवींद्र सकपाळ आदी उपस्थित होते.
माय राजापूर सदस्यांचा सहभाग
अभियानाच्या आजच्या हातखंबा ते खारेपाटण या दौऱ्याची सुरुवात हातखंबा येथे हॉटेल अलंकारमध्ये झाली. त्यामध्ये माय राजापूर संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेतला. राजापूर येथील आखणी बदल आणि कामाच्या दर्जाबाबत माय राजापूरचे जगदीश ठोसर यांनी माहिती दिली. यशवंत पंडित यांनी तांत्रिक गोष्टींचे मार्गदर्शन केल्यानंतर महामार्ग पाहणी सुरू झाली. लांजा येथे स्थानिकांशी संवाद आणि पत्रकार परिषद झाली. राजापूर येथे पुनर्वसन भागातील लोकांशी चर्चा केली. त्यानंतर टाकेवाडी, तळगाव येथे राजापूरच्या सीमेवर दौऱ्याची सांगता झाली.
महामार्गाचे चौपदरीकरण लवकर आणि दर्जेदारपणे पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करणे, झालेल्या कामातील चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून सोडविणे, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कोकणला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच कोकणला न्याय मिळवून देण्यासाठी हा दौरा झाला. स्थानिक जनतेने महामार्गाचे काम दर्जेदार करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवला, तर या आंदोलनाला सरकार लवकर सकारात्मक प्रतिसाद देईल. त्यासाठी लोकांनी समन्वय समितीत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. यादवराव यांनी कोकणी जनतेला केले.
………
हातखंबा येथील कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर जा – https://youtu.be/0LrZeXoQ_K8

