नारळ उत्पादक नोंदणीविषयीचा संदेश फसवणूक करणारा

रत्नागिरी : कोकण नारळ विकास मंचाच्या नावे नारळ उत्पादकांची नोंदणी करण्याविषयीचा संदेश सध्या व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होत आहे. नावनोंदणीची मुदत येत्या २५ डिसेंबरपर्यंत असून किमान १५० ते जास्तीत जास्त दीड लाखाचे अनुदान मिळण्यासाठी गुगल लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये ईमेल किंवा संपर्क क्रमांक, तसेच कोणत्याही व्यक्तीचे नाव दिले गेलेले नाही. अशी अनुदानाची कोणतीही योजना नसल्याचे शासकीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

अशा पद्धतीचा मेसेज सध्या फिरत आहे.

व्हायरल झालेल्या त्या संदेशात म्हटले आहे, की कोकणातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक झाडामागे १५० रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच खतांवर, औषधांवर अनुदान मिळणार आहे. उत्पादकांना प्रत्येक झाडामागे जास्तीत जास्त १५० रुपये अनुदान मिळणार आहे. नारळाचे एक झाड असल्यास जास्तीत जास्त १५० रुपये, तर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दीड लाख रुपये अनुदान मिळेल, असेही त्यात म्हटले आहे. या अनुदानास पात्र होण्यासाठी गुगल लिंकद्वारे अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लिंकवर शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा किंवा गोवा यापैकी एक), मोबाइल क्रमांक द्यावयाचा आहे. नारळ उत्पादक शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये जोडले जाईल. नारळ उत्पादनासंदर्भात माहिती तसेच सूचना वेळोवेळी पाठवल्या जातील. त्यासाठी व्हॉट्सअॅपचा मोबाइल क्रमांक द्यावा. व्हॉट्सअॅपचा स्वतःचा क्रमांक नसल्यास जवळच्या व्हॉट्स अॅप वापरणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक द्यावा, असे सूचित करण्यात आले आहे. याशिवाय नारळाची एकूण झाडे किती आहेत, अजून नारळ लागत नाहीत अशी किती झाडे आहेत, नारळ लागणारी झाडे किती, एक वर्षाला किती नारळाचे उत्पादन होते, इत्यादी तपशील मागविण्यात आला आहे. कोकण नारळ विकास मंचाकडून सरकारी अनुदान तसेच मंचाचे अनुदान, सर्व प्रकारच्या खते, कीटकनाशके औषधे उपलब्ध करून दिली जातील, संबंधित शेतकऱ्याकडून कोणतीही रक्कम किंवा शुल्क किंवा पैसे घेतले जाणार नाहीत. कोकणातील सध्याच्या नारळ पिकाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही योजना अगदी नारळाचे एक झाड असणाऱ्या शेतकऱ्यापासून ते मोठ्या बागा असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असेही संदेशात म्हटले आहे.

याबाबत रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की नारळ उत्पादकांना नारळाच्या झाडासाठी अनुदान देण्याची शासनाची कोणतीही योजना नाही. तसेच कोकण विकास नारळ मंच या नावाची कोणतीही संस्था कृषी विभागाकडे नोंदणी झालेली नाही.

स्वराज अॅग्रो या रत्नागिरीतील नारळविषयक संस्थेचे संचालक तुषार आग्रे यांना याबाबत माहिती विचारली असता, ते म्हणाले, की नारळ विकास मंडळाकडून केवळ नारळाच्या लागवडसाठी हेक्टरी ८ हजार रुपये म्हणजेच एका रोपामागे ४५ रुपये अनुदान दिले जाते. त्याव्यतिरिक्त कोणतेही अनुदान दिले जात नाही. या गुगल फॉर्ममधून शेतकऱ्यांकडून परिपूर्ण माहिती मागविली असताना कोकण विकास नारळ मंचाने नोंदणी क्रमांक, संचालकांचे नाव, संपर्क क्रमांक, संकेतस्थळ किंवा ईमेलसुद्धा दिलेला नाही. त्यावरून मंचाला आपली ओळख लपवून ठेवायची आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तपशील गोळा करून तो इतर कारणांसाठी वापरला जाऊ शकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply