इंग्लंडमधून रत्नागिरीत आलेले ९ प्रवासी संस्थात्मक विलगीकरणात

रत्नागिरी : इंग्लंडमधून गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या नऊ प्रवाशांना संस्थांत्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा नवा प्रकार दिसल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लंडनमध्ये नुकतीच लॉकडाउनची घोषणा केली. इंग्लंडच्या आग्नेय प्रदेशात करोना विषाणूचा एक प्रकार फैलावत आहे. हा विषाणू मूळ करोना विषाणूच्या तुलनेत ७० टक्के संसर्गजन्य आहे, त्याला रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारावा लागत असल्याचे जॉन्सन म्हणाले. इंग्लंडच्या अनेक भागांमध्ये ख्रिसमस मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. करोनाने हल्ला करण्याचे तंत्र बदलले आहे. त्यामुळे बचावाचे तंत्र बदलले पाहिजे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याची माहिती मिळाल्याने खबरदारीचे उपाय करावे लागत असल्याचे जॉन्सन म्हणाले.

इंग्लंडमध्ये आढळलेला करोनाचा हा नवा विषाणू अधिक घातक आहे. आधीच्या करोनापेक्षा याचा फैलाव होण्याचा वेग ७० टक्के अधिक आहे. या पार्श्वभूमीवर लंडनमधून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. शेवटची काही विमाने भारतात आली. त्यातील एका विमानातून नवी दिल्लीत दाखल झालेल्या विमानात ५ प्रवासी करोनाबाधित आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी आहे. मत्र ब्रिटनमधील या प्रकारानंतर आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लंडनमधून आलेल्या प्रवाशांची यादी ठिकठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. गेल्या २५ नोव्हेंबरपासून २३ डिसेंबरपर्यंत आलेल्या प्रवाशांची नावे कळविण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ९ प्रवासी आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यांचा शोध घेण्यात आला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यापैकी ५ जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणासाठी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना रत्नागिरीच्या एमआयडीसी विश्रामगृहावर संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. हे सर्व स्थानिक असून नोकरी-व्यवसायानिमित्त लंडनला गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विलगीकरणात ठेवलेल्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही केली जाणार आहे. तूर्त त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून वेळ पडल्यास त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. आता विलगीकरणात ठेवलेले प्रवासी भारतात आल्यापासून २८ दिवसांपर्यंत त्यांच्या तब्येतीचा पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच विदेशातून आलेल्या प्रवाशांनी स्वतःहून जिल्हा प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply